ग्रेट निकोबार प्रकल्पाला सोनिया गांधीचा विरोध मोडून काढायलाच हवा – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक

ग्रेट निकोबार प्रकल्पाला सोनिया गांधीचा विरोध मोडून काढायलाच हवा – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि ब्लॉगर वेदकुमार यांची एक पोस्ट आज समाज माध्यमांवर वाचण्यात आली. वेदकुमार यांनी त्यात एका प्रकल्पाला आता काँग्रेसकडून होऊ घातलेल्या विरोधाबाबत गौप्यस्फोट केला आहे.मोदी सरकारने हाती घेतलेल्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि एकूणच देशातील विरोधी पक्ष करत असलेल्या विरोधाबाबत वेदकुमार यांनी लिहिले आहे.

वेदकुमार यांच्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी विरोध केलेला ग्रेट निकोबार प्रकल्प हा भारताच्या हिंद महासागरा तील नवा प्रकल्प असून तो पूर्ण झाल्यावर भारतीय सामर्थ्याचा नवा अध्याय ठरणार आहे.सोनिया गांधी यांनी कॉम्रेड एन.राम यांच्या द हिंदू या कम्युनिस्ट मुखपत्रातून एक लेख लिहून या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी ज्याप्रमाणे कोकणातल्या नाणार प्रकल्पाला किंवा मुंबई मेट्रो प्रकल्पाला विरोध केला होता, मेधा पाटकर यांनी नर्मदा डॅमला जसा विरोध केला होता, अगदी तसाच पर्यावरण या मुद्द्यावरून सोनिया गांधी यांनी हा विरोध केला आहे. त्यात सोनिया गांधींचे चिरंजीव राहुल उर्फ पप्पु आणि जॉर्ज सोरोसचे चिरंजीव अलेक्झांण्डर नुकतेच मलेशियात भेटल्याच्या चर्चा सुरू असताना हिंदुचे संपादक कॉम्रेड एन.राम यांनी सोनिया गांधी यांना व्यासपीठ दिले आहे,हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही असा दावाही वेदकुमार यांनी केला आहे.

भारताचा ग्रेट निकोबार प्रकल्प हा केवळ पायाभूत विकासाचा उपक्रम नाही तर तो राष्ट्रीय सुरक्षेचा आणि सामरिक वर्चस्वाचा कार्यक्रम असून हा प्रकल्प म्हणजे एकप्रकारे भारताची जिओपोलिटिकल अपरिहार्यताच आहे असे सांगून वेदकुमार म्हणतात की हा प्रकल्प आर्थिक वाढ,सागरी सामर्थ्य आणि राष्ट्रीय सुरक्षा या सर्वांचा त्रिवेणी संगम ठरणार आहे.हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यास भारताची इंडो-पॅसिफिकमधील भूमिका निर्णायकरीत्या बदलून जाईल आणि देशाचे दीर्घकालीन हितसंबंध अधिकाधिक सुरक्षित होतील.

या प्रकल्पाच्या मध्यभागी आहे गलथेआ खाडी, जिथे भारत एक जागतिक दर्जाचा डीप-सी ट्रान्सशिपमेंट पोर्ट उभारत आहे. आजही भारतातील बहुतांश कंटेनर वाहतूक परदेशी केंद्रांवर म्हणजे सिंगापूर किंवा कोलंबोवर अवलंबून आहे. या प्रकल्पामुळे भारत स्वतःचे मोठे जागतिक मालवाहतुकीचे केंद्र निर्माण करेल.त्याचबरोबर ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, दरवर्षी चार दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेल्या धावपट्टीसह आणि आधुनिक टाउनशिप विकसित होणार आहे, ज्यात दीर्घकालीन दृष्टीने सुमारे चार लाख लोकांची (प्रामुख्याने डिफेन्ससंबंधी) वस्ती असेल.गॅस आणि सौर- आधारित वीज प्रकल्प उभारून बेटाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचीही योजना आहे अशी माहिती देखील वेदकुमार यांनी दिली आहे.

सुमारे १६४ चौ.कि.मी.क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प, ₹७२०००-८१००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह साकारला जाणार आहे. पर्यटन,व्यापार,लॉजिस्टिक्स व कम्युनिकेशन यांचे केंद्र म्हणून ग्रेट निकोबारला बदलून टाकण्याची क्षमता यात आहे. मात्र या प्रकल्पाची खरी ताकद केवळ अर्थकारणात नाही.ग्रेट निकोबार हा मलक्का सामुद्रधुनी पासून अवघ्या ९० नौटिकल मैलांवर आहे. जगातील ४० टक्के व्यापार आणि चीनचा बहुतांश तेल पुरवठा या मार्गाने होतो. या बेटाला मजबूत बनवून भारताला या महत्वाच्या सागरी मार्गांवर लक्ष ठेवण्याची व प्रभाव टाकण्याची अनन्य साधारण संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प प्रचंड बळकटी देणारा आहे.अंदमान- निकोबार मध्ये आधीपासूनच भारताची एकमेव ट्राय-सर्व्हिसेस कमांड आहे.आता आधुनिक बंदरे,धावपट्ट्या व लॉजिस्टिक सुविधा उभारून भारताला तातडीने सैन्य तैनात करण्याची, देखरेख ठेवण्याची व आपल्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्याची क्षमता दुप्पट मिळेल.अमेरिका जपान व ऑस्ट्रेलिया सारख्या क्वाड भागीदारांबरोबर भारताचे सहकार्य अधिक बळकट होईल आणि इंडो-पॅसिफिक रिजन भयमुक्त,खुले व सुरक्षित ठेवण्याचा निर्धार दृढ होईल.

वरील सर्व मुद्दे मांडत वेदकुमार म्हणतात की याच कारणामुळे चीनला हा प्रकल्प अजिबात रुचणारा नाही. मलक्का सामुद्रधुनी ही चीनच्या ऊर्जा पुरवठ्याची जीवनरेषा आहे. ग्रेट निकोबारमुळे भारताला त्यावर लक्ष ठेवण्याची सामरिक ताकद मिळेल. संकटाच्या वेळी भारत चीनची सप्लाय-चेन विस्कळीत करू शकतो.त्याचबरोबर या प्रकल्पामुळे श्रीलंका,पाकिस्तान व म्यानमार मधील चीन-प्रायोजित बंदरांचे महत्त्व जवळजवळ शून्य होईल.थोडक्यात ग्रेट निकोबार चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स धोरणाला थेट आव्हान आहे.

या प्रकल्पावर पर्यावरण व सामाजिक परिणामांचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते गंभीर आहेत आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण देशहिताकडे पाहता या कारणांनी प्रकल्प रोखणे म्हणजे मूर्खपणा ठरेल.विकास आणि संवर्धन हे परस्परविरोधी नसून योग्य धोरणाने दोन्ही एकत्र साध्य होऊ शकतात.

हे देखील स्पष्ट आहे की चीनद्वारे निधी मिळवणाऱ्या तथाकथित पर्यावरणवादी एनजीओ, बीजिंगच्या पैशावर चालणारी काही मीडिया होऊसेस आणि काँग्रेससारखे विरोधी पक्ष ज्यांचे चीनी कम्युनिस्ट पक्षा सोबत थेट सामंजस्य करार (MoU) आहेत, ते हा प्रकल्प हताशपणे रोखण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा उद्देश भारताच्या विकासाला व भारत बलशाली होण्याला अडथळा आणणे हा आहे. पर्यावरण आणि समाजाचा आडोसा घेऊन ते त्यांच्या चीन सोबत असलेल्या हितसंबंधांसाठी पुढे सरसावले आहेत.सोनिया गांधींचा द हिंदू मध्ये प्रकाशित झालेला लेख ही या प्रकाराची सुरुवातच म्हणावी लागेल.त्यामुळे त्यांच्या विरोधामागचा खरा चेहरा ओळखणे आवश्यक आहे.

ग्रेट निकोबार प्रकल्प भारताला इंडो – पॅसिफिकमध्ये अभूतपूर्व सागरी वर्चस्व मिळवून देणार आहे.त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जिओपोलिटिक्स च्या खेळात भारताला एक सामर्थ्यवान खेळाडू बनवेल. मोदी सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प एक आत्मनिर्भर,सक्षम आणि अजेय भारत बनवणार यात शंका नाही.सोनिया गांधींना नेमका यामुळेच पोटशूळ उठला आहे. सोनिया,राहुल, प्रियांका या तिघांनीही या प्रश्नावर एकाच वेळी ट्विट करत मोर्चा उघडला आहे.या तिघांनीही एकदमच दंड थोपटणे याचा अर्थ असाही काढता येईल की हा प्रकल्प १०० टक्के भारतासाठी चांगला आणि चीनसाठी धोकादायक आहे हे स्पष्ट दिसते आहे.

आपल्या देशात अशा प्रकारे देशहिताच्या प्रकल्पांना विरोध करणे ही आज देशातील एका विशिष्ट गटाची स्टाईल ठरली आहे. कारण त्यांना देशाचा विकासच नको आहे. इतकेच काय पण त्यांना परदेशाचे हित जोपासायचे आहे.त्यासाठी ते परकीयांची मदत करायला देखील तयार असतात. या प्रकरणात वेदकुमार यांनी विरोधकांना चीनची मदत होत असल्याचा आरोप केला आहेच.चीन सोबतच अमेरिकेचाही विरोध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेला देखील भारत हा विकसनशील देश म्हणूनच हवा आहे,भारताने विकसित देश म्हणून जगात आपली ताकद निर्माण करण्यास त्यांचा विरोध आहे.त्यासाठी ते हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत.सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले टॅरिफ वॉर हा देखील त्यातलाच प्रकार आहे.

मात्र गत अकरा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने सर्वच आघाड्यांवर प्रगती केली आहे.आजवर काँग्रेसची राजवट असताना ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या सुधारण्याचा संपूर्ण प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.त्यामुळेच देशात विकासाची नवी नवी दालने उघडली जात आहेत.भारत आता स्वयंपूर्ण होऊ बघतो आहे.आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.तेच अमेरिकेच्या पोटात दुखते आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना रसद पुरवून या भारत विरोधी देशांकडून अशी आंदोलने भडकवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इथे वाचकांना एक संदर्भ सांगण्याचा मोह आवरत नाही.२००८ मध्ये अणु करार प्रकरणात कम्युनिस्ट पक्षाने डॉ.मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यामुळे भाजपने सरकार विरोधात अविश्वास ठराव आणला होता.त्यावेळी मुंबईतील एका व्यापारी दूतावासात एका वरिष्ठ पत्रकाराला अमेरिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी भेटले. त्या वेळी चर्चेत अविश्वास ठरावाचा विषय निघाला.तेव्हा ते अमेरिकन अधिकारी छातीठोकपणे सांगते झाले की हा ठराव पारित होणार नाही.मात्र त्यावेळी विरोधकांचे संख्याबळ जास्त होते.तरीही अमेरिकन अधिकाऱ्यांचा हा दावा ऐकून तो पत्रकार चक्रावला होता.

अखेरच्या क्षणी मात्र चमत्कार घडला. अविश्वास ठरावावर मतदान सुरू होण्या पूर्वीच सभागृहात कॅश फोर व्होट चा प्रकार घडला.भाजपचेच काही खासदार फुटले आणि मनमोहन सिंग सरकार तरले.हे बघता त्यावेळी देखील अमेरिकेला मनमोहन सिंग यांचेच सरकार हवे होते आणि त्यांनी ते साध्य करून घेतले.यावरून विरोधकांना परकीय शक्ती त्यांच्या स्वार्थासाठी वापरून घेतात हे दिसून येते.

आज या प्रकारात सोनिया गांधींनी एक लेख लिहिला आहे.हळूहळू या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील.तिथे पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केला जाईल मग त्या बेटातील आदिवासींचे काय हा प्रश्न उपस्थित करून मानवाधिकार आयोगाकडे देखील दाद मागितली जाईल.एकूणच प्रकल्पाला अपशकुन कसा करता येईल हे प्रयत्न अधिक ताकदीने केले जातील.

अर्थात त्यामुळे काही फारसे होईल असे वाटत नाही्. नरेंद्र मोदींनी आजपर्यंत जे काही कार्यक्रम ठरवले ते जिद्दीने राबवले आहेत.तिथे त्यांनी विरोधकांचा विरोध पुरता मोडून काढला आहे.त्याचे उत्तम उदाहरण काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावून ३७० कलम रद्द करणे हे आहे.त्यामुळे मोदी सोनिया गांधींच्या या परदेशी प्रायोजित आंदोलनाला फारशी भिक घालणार नाहीत आणि ते ग्रेट निकोबार

प्रकल्प पूर्णत्वास येईल याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी.यावेळी प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाने विरोधकांच्या दबावाला बळी न पडता विरोधकांचे असे प्रयत्न हाणून पाडायला हवेत.त्याचबरोबर सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी वेदकुमार यांनी समाजमाध्यमांद्वारे हे प्रकरण जनतेसमोर आणले त्याबद्दल त्यांनाही धन्यवादच द्यायला हवेत.

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक

Leave a Reply

Back To Top