राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान, हक्कांसाठीचा लढा – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सन १९७५ ते १९९० या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने एकाधिकार शाही विरोधात घेतलेल्या भूमिकेतून बिहारमधील चळवळीने भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश..! असा देशभरात नारा लगावून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अर्थात काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्याचे बहुतांश श्रेय हे बिहारकडे जाते.अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींचा जन्म बिहारमधून झाला आहे,ज्यांनी भारतीय राजकारणाला दिशा दिली आहे.
भारतीय राजकारणात बिहार राज्याचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे.सामाजिक न्यायाच्या चळवळींपासून ते जातीय समीकरणे,ग्रामीण-शहरी मतदार, स्थलांतर, बेरोजगारी आणि केंद्र-राज्य संघर्ष, या सगळ्या मुद्द्यांचे प्रतिबिंब येथे स्पष्ट दिसते.दोन ते तीन महिन्यांनी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.या पार्श्वभूमीवर बिहार मधील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या मतदार अधिकार यात्रेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपासून मतदार नोंदणीच्या कथित गैरप्रकारावरून कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येते आहे.हाच कळीचा मुद्दा त्यांनी बिहारमधील या यात्रेतही केंद्रस्थानी ठेवला आहे.विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशा राहुल गांधी यांच्या पाटण्याला चकरा वाढत गेल्या आहेत.या चालू वर्षात राहुल गांधी यांनी बिहारला सहा वेळा भेट दिली आहे. एसआयआरचा आधार घेत राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीची मंडळी निवडणूक रणनीतीला आक्रमक रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनःपडताळणी मोहिमेच्या विरोधात राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी बिहारच्या सासाराम येथून मतदार अधिकार यात्रा सुरू केली आहे.ही यात्रा राज्यातील २५ जिल्ह्यातून जाणार आहे. एक सप्टेंबरला पाटण्याच्या गांधी मैदानात या यात्रेचा समारोप आहे. चौदा कोटी बिहारवासियांशी थेट संपर्क साधण्याच्या हेतूने सुरू केलेल्या या यात्रेत इंडिआतील बहुतांश घटक पक्षाचे नेते सामील झाले आहेत.

राहुल गांधी यांनी एक व्यक्ती एक मत लोकशाहीतील मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे सांगत जनतेला राज्यघटनेला वाचविण्याचे आवाहन केले.त्याचवेळी तेजस्वी यादव यांनी देखील ही यात्रा निवडणुकीसाठी नाही तर बिहार आणि बिहारच्या जनतेचा सन्मान, स्वाभिमान,हक्क आणि लोकशाही वाचविण्यासाठी उभारलेला हा लढा आहे असे सांगितले आहे. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर प्रचंड टीका केली आहे. त्यांनी थेट भाजपवर मतचोरी होत असल्याचा आरोप केला.जेथे जेथे निवडणूक आहे, तेथे तेथे भाजप मतांची चोरी करत सरकार स्थापन करत असल्याचा दावा केला.यावरून मतदार यादीचा मुद्दा इंडि’च्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.मात्र यातही प्रत्येकाचे हित दडलेले आहे.मतदार अधिकार यात्रा ही ‘इंडिआ’तील घटक पक्षांना संबंधित भागात संपर्क साधण्याची मोठी संधी देणारी ठरली आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींनी तब्बल १३ दिवस बिहारमध्ये मुक्काम केला. कदाचित हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मुक्काम असू शकतो.या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले.प्रशांत किशोर सारख्यांनी त्यांना आव्हान देत राहुल गांधी यांनी बिहारच्या खेडेगावात एक रात्र तरी मुक्काम करावा,’ असे आव्हान दिले होते. त्यालाही राहुल यांनी चांगले प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात अशा यात्रा काढणे स्वाभाविक आहे.परंतु बिहारमध्ये १९८८ नंतर विरोधकांचे ऐक्य दाखविणारी ही पहिलीच यात्रा आहे.यात आघाडीतील सर्वच घटक पक्ष सक्रियपणे सामील झाले आहेत. तत्कालिन काळात व्ही.पी.सिंह यांनी जनमोर्चाच्या नावाखाली बिहार मध्ये अनेक भागात दौरे काढले होते. त्यावेळीही त्यांच्या यात्रेत अनेक पक्षही सामील झाले होते आणि या यात्रेनंतरच केंद्रात आणि बिहारमध्ये सत्तांतर झाले.वास्तविक आघाडीतील घटक पक्ष निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात एकत्रपणे सभा घेत असतात. परंतु यात्रेच्या रूपाने एकत्र फिरण्याचे दृश्य ३७ वर्षानंतर प्रथमच दिसत आहे.या काळात महाआघाडी चे नेते आणि कार्यकर्ते बिहारच्या सुमारे १७५ विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर आपला मुद्दा मांडताना दिसले.सर्वच घटक पक्षांनी आपापल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अधिकाधिकपणे यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास राज्यात कोणकोणत्या सुविधा दिल्या जातील याचीही जंत्री या यात्रेच्या निमिताने मांडण्यात आली आहे. आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरही या चर्चेदरम्यान चर्चा झाल्या. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की,राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत नेली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली.
अशा प्रकारच्या यात्रांचे राजकारणात मोठे महत्त्व राहिलेले आहे. मागील काळात भारत जोडो यात्रेच्या मदतीने राहुल गांधी यांनी लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचे मुद्दे मांडत प्रत्येक श्रेणीतील मतांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून ते एसआयआर चा मुद्दा तापवत आहेत आणि इंडिआ’त ऐक्य असल्याचेही सांगत आहेत. बिहारमध्ये इंडिआचे नेतृत्व तेजस्वी यादब यांच्याकडे आहे.सध्याच्या स्थितीत काँग्रेस आणि राजदच्या एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे ऐक्य बाळगले नाही तर सत्तेपासून दूर रहावे लागेल.दोन्ही पक्षांचे राजकारण प्रामुख्याने मुस्लीम,अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांच्या आघाडीवर अवलंबून असेल तर अशावेळी मतैक्य राहणे गरजेचे आहे.आपल्यात फूट पडल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते हे सर्वच घटक पक्षांनी ओळखले आहे.या यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी लोकांना थेट भेटणे,बेरोजगारी,महागाई,भ्रष्टाचार,शिक्षण व आरोग्याच्या समस्या यावर चर्चा करणे आणि मोदी सरकारच्या धोरणांविरुद्ध राजकीय पर्याय उभा करणे हा होता.गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष बिहारमध्ये जवळजवळ संपुष्टात आला होता.राष्ट्रीय स्तरावर मोदी लाटेला थोपवणे काँग्रेसला शक्य झालेले नाही आणि बिहारसारख्या राज्यात काँग्रेस पक्षाची स्थिती तितकीशी समाधानकारकही नाही.
लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी राज्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या आरजेडीला २०१५ नंतर सतत संघर्ष करावा लागला. नितीशकुमार यांची राजकीय धोरणे, भाजपशी झालेली आघाडी आणि वारंवार बदलणारे समीकरण यामुळे बिहारमधील विरोधक विखुरले गेले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची संयुक्त यात्रा हा राजकीय प्रयोग यशस्वी ठरणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे,
राहुल गांधी यांनी अशा प्रकारच्या यात्रांच्या माध्यमातून स्वतःला तळागाळातल्या जनतेशी थेट संवाद साधणारा नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. लोकांशी थेट भेटणे,शेतकरी,कामगार,विद्यार्थी, महिला,आदिवासी यांच्या समस्या ऐकणे, यावर त्यांचा भर राहिला आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादवांसारख्या तरुण आणि लढाऊ प्रतिमेच्या नेत्याची त्यांना साथ मिळत आहे. या यात्रेत मतदारयाद्यांची चर्चा अधिक प्रमाणात केली गेली असली तरी बिहार मधील युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यावर या जोडगोळीचा भर आहे.गेल्या दोन दशकात स्थलांतरामुळे लाखो युवक बिहारबाहेर गेले आहेत.दिल्ली, मुंबई, सुरत, पंजाब याठिकाणी मजुरी करणाऱ्या बिहारच्या कामगारांची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. रोजगाराच्या संधींचा अभाव, शैक्षणिक पायाभूत सुविधांची दुरवस्था, सरकारी भरतीतील भ्रष्टाचार आणि विलंब या सगळ्या मुद्द्यांवरून बिहारमधील तरुणाई नाराज आहे. तेजस्वी यादव यांनी जेव्हा १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, तेव्हा हीच तरुणाई त्यांच्याकडे पाहत होती.जातीय समीकरणांचा विचार केला तर बिहारमध्ये यादव,मुस्लीम,दलित आणि इतर मागासवर्ग हे विरोधी आघाडीचे नैसर्गिक मतदार आहेत. परंतु गेल्या दशकात भाजपने बिगर यादव ओबीसी, सवर्ण, अति मागास गट आणि महिलांना आपल्याकडे खेचले.नितीशकुमार यांनी सत्तेत राहण्यासाठी वारंवार भूमिका बदलली.कधी भाजप सोबत तर कधी विरोधकांसोबत गेले.त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी काहीशी नाराजी आहे.राहुल आणि तेजस्वी यांनी या यात्रेच्या माध्यमातून हा नाराजवर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.या यात्रेचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे.अशावेळी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मिळून राबवलेली ही राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा बिहारच्या जनतेचा सन्मान, स्वाभिमान, हक्कांसाठीचा लढा आहे.

- -डाॅ.सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर
भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशीचे संपादक आहेत.) इंडिआ आघाडी, नवा आत्मविश्वास निर्माण, बिहार न्यूज,राजकारण,बिहार तरुणाई, शेतकरी,वंचित समाजघटक,डाॅ.सुनीलकुमार सरनाईक,भारत सरकार,स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्कार,जयप्रकाश नारायण,