कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्र मोठा केला..रयत शिक्षण संस्था- महाराष्ट्राचे हृदय… कर्मवीर जयंती कार्यक्रमात प्रा.एन.डी.बिरनाळे यांचे प्रतिपादन

सांगली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील बहुजनांच्या लेकरांचे नशीब घडवले. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाईं यांनी स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवला, बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडं खुली करुन दिली म्हणून महाराष्ट्र मोठा झाला व शंभर वर्षे पुढे गेला.हा त्याग शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. रयत शिक्षण संस्थेच्या शाखा म्हणजे महाराष्ट्राच्या रक्तवाहिन्या आहेत.. अण्णा झाले नसते तर महाराष्ट्राला एकाच वेळी तीन मागासवर्गीय कुलगुरु लाभले नसते.अण्णा हे कुलगुरुंचे कुलगुरू होते.अण्णांशिवाय कवलापूरचा पांडुरंग म्हणजे पी.जी.बॅरिस्टर अन कुलगुरू झाले नसते.. संसद आणि विधीमंडळात लोकशाही व स्वातंत्र्याचे रक्षण करणारे लोकप्रतिनिधी घडले नसते.जगाच्या पाठीवर कर्मवीर अण्णांनी जेवढे विद्यार्थी घडविले तेवढे कोणीच घडवले नाहीत. गरिबांच्या लेकरांना सणाला गोडधोड करुन घालण्यासाठी मंगळसूत्र विकलं त्या रयत माऊली लक्ष्मीबाईं महाराष्ट्राच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सौभाग्य आहे.. कर्मवीरांनी जातीपातीच्या भिंती गाडून टाकल्या आणि कमवा शिका योजनेतून महाराष्ट्राला स्वाभिमानी व स्वावलंबी नागरिक उपलब्ध करून दिले असे भावपूर्ण उद्गार कर्मवीर व्याख्याते प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी काढले.

ऐतवडे बुद्रुक ता.वाळवा जिल्हा सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर जयंती व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बाॅडीच्या सदस्य व संस्था मोठी करण्यात भरीव योगदान राहिलेल्या स्व.डॉ.एन.डी पाटील यांना खंबीर साथ दिलेल्या श्रीमती सरोजमाई पाटील होत्या.प्रारंभी शाळेच्या प्रांगणातील कर्मवीरांच्या पुतळ्यास प्रा.एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रयत माऊली सभागृहात प्रतिमा पूजन, स्वागत व रयत गीत विद्यार्थ्यीनीनी सादर केले. पाहुणे परिचय जगदाळे ए.आर. यांनी करुन दिला.
प्रारंभी प्राचार्य यू.बी.वाळवेकर यांनी प्रास्ताविकात शाळेचे उत्कृष्ट निकाल, शालेय व सहशालेय उपक्रम, विविध विभाग, शिस्त, मा. सरोजमाई, संस्था व शाळा व सल्लागार समितीचे सहकार्य याचा आवर्जून उल्लेख करुन अहवाल सादर केला.

दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.
अनुष्का चव्हाण व श्रावणी उपाध्ये या विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर मनोगत व्यक्त केले. जाधव डी.ए.यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात सरोजमाईंनी ‘ महाराष्ट्रात दोन कर्मवीर झाले एक तलवारीच्या जोरावर स्वराज्य मिळवून दिलेले छ. शिवाजी महाराज आणि दुसरे लेखणीतून महाराष्ट्राचे भाग्य घडवलेले भाऊराव पाटील. शिक्षक हे व्यसनमुक्त असले पाहिजेत..फळ्यावरचा हात विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. हात व मन स्वच्छ हवेत. झोकून देऊन अध्यापन केले पाहिजे.. त्यांना विद्यार्थ्यांचे मित्र बनता आले पाहिजे.. अभ्यासक्रमातून सुसंस्कृत नागरीक निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांनी नेटाने पार पाडली तर बहुजन समाज शिक्षण मजबूत होईल आणि कर्मवीर व रयत माऊली लक्ष्मीबाईंचा त्याग सार्थकी लागेल. रयत सेवक हा एक मानाचा ब्रँड आहे. त्याची शान वाढेल असे काम करा. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करुन उत्तम करीअर करावे.सर्वांनी कर्मवीरांची आदर्श जपावा.

यावेळी श्री. खटावकर आणि खरळकर यांनी शाळेला सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडीग मशीन भेट दिले. त्यांचा व देणगीदारांचा सत्कार आला.

सूत्रसंचालन सौ. एस. एस. तळवलकर यांनी केले. आभार एस. व्ही. गायकवाड यांनी मानले. यावेळी बाबासाहेब गायकवाड, दिपकराव जाधव, उत्तमराव शेळके, आनंदराव खडके, सुनील खरळकर, प्रा. अजित बुद्रुक, प्रविण सुतार, ए. एस. पाटील प्रकाश सादळे, आर. के. कुंभार, विठ्ठल पोतदार प्रा. सदामते, सीमा यादव, मिनाक्षी पाटील, पूजा स्वामी, सीमा पाटील, प्रतिभा पाटील, पूनम खोत, माधुरी पाटील, अनिल पाटील इस्लामपूर, कुरळपचे सरपंच मदन शेटे, विलास पाटील सर व स्टाफ आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.