शूरवीर जिवाजी महाले समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आमदार शंकर मांडेकरांचे आश्वासन- स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराला पाठिंबा

शूरवीर जिवाजी महाले समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आमदार शंकर मांडेकरांचे आश्वासन- स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराला पाठिंबा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक असलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारा साठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचा प्रस्ताव

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ नोव्हेंबर २०२५: आज रोजी भोर-राजगड-मुळशी मतदार संघाचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांची भेट घेऊन स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी गड किल्ले संवर्धन सेल, महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रतिनिधींनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर केला.

प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी आमदार शंकर मांडेकर यांना जिवाजी महाले समाधीच्या इतिहासाची आणि सध्याच्या स्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की,दरवर्षी जिवाजी महाले पुण्यतिथी निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच दिवाबत्तीची सोय आणि परिसराची स्वच्छता हे कामही प्रतिष्ठान स्वतःच्या खर्चाने करते.

सन २०१५ साली स्वखर्चाने समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. मात्र, आता समाधीचा परिसर अधिक सुंदर आणि ऐतिहासिक दृष्ट्या योग्य पद्धतीने विकसित व्हावा, यासाठी शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शंकर भाऊ मांडेकर म्हणाले की, शूरवीर जिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील एक अविभाज्य अंग आहे. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार अत्यंत सन्मानाने व चांगल्या पद्धतीने करण्यात येईल.मी स्वतः या कामाकडे लक्ष देईन आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीन.

आमदारांच्या या आश्वासनामुळे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपस्थित प्रतिनिधी:

स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य,राष्ट्रवादी गड किल्ले संवर्धन सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले की, जिवाजी महाले यांच्या शौर्याचा गौरव जपण्यासाठी हा प्रयत्न पुढेही सुरूच राहील.

पार्श्वभूमी:

शूरवीर जिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून ओळखले जातात. महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांच्या समाधीचे संरक्षण, संवर्धन व परिसराचे सौंदर्यीकरण हे राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Back To Top