सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान!

सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान ! फसवणूक टाळा – ॲड.चैतन्य भंडारी

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या काही वर्षांपासून सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. कपड्यांपासून ते कॉस्मेटिक्स,भेटवस्तू व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी ग्राहक ऑनलाईन माध्यमातून करत आहेत. या ग्राहकवर्गाचा फायदा घेत अनेक ई- कॉमर्स कंपन्यांनीही आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.

मात्र दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर खोट्या ऑफर्स,नकली वेबसाइट्स आणि फेक डिलिव्हरी कॉल्सद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत,असा इशारा सायबर तज्ज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी दिला आहे.

सायबर चोरट्यांचा सणासुदीचा हल्ला

सायबर चोरटे प्रतिष्ठित कंपन्यांच्या हुबेहूब वेबसाइट्स तयार करून सोशल मीडियावर खोट्या ऑफर्स शेअर करत आहेत.
काही प्रकरणांमध्ये ग्राहकांनी पेमेंट केल्यानंतर वस्तू आली नाही, वेबसाइट गायब झाली किंवा कार्ड-बँक माहिती चोरली गेली आहे.काही चोरटे कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली ओटीपी मागून मोबाईल हॅक करण्याचाही प्रयत्न करत आहेत.

सुरक्षित ऑनलाईन खरेदीसाठी सल्ले

सायबर तज्ज्ञ ॲड. भंडारी यांच्या मते —
ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत वेबसाइट्स किंवा ॲप्स वापरा.
सोशल मीडियावरील अति स्वस्त ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.
पेमेंट करताना कॅश ऑन डिलिव्हरी किंवा विश्वासार्ह पेमेंट गेटवे वापरा.
कोणत्याही कुरिअर एजंटला ओटीपी, बँक डिटेल्स, UPI पिन सांगू नका.
मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये पेड अँटीव्हायरस वापरा.

फसवणुकीची नवी पद्धत

सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे दिवाळी सेल सुरु आहेत. त्याच वेळी चोरटे बनावट वेबसाइट्स तयार करून जास्त सवलती दाखवत आहेत —
उदाहरणार्थ कंपनी ३०% सवलत देते,पण बनावट साइटवर ८९% सवलत दाखवली जाते.

ग्राहकांना डिस्काऊंट व्हाउचरच्या लिंक पाठवल्या जातात आणि त्यावर क्लिक केल्याने फसवणूक होते.तसेच पार्सलच्या तारखेतील बदल सांगणाऱ्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते — ही लिंक ओपन करू नका.

 ऑफलाईन शॉपिंगमध्येही खबरदारी

ऑफलाईन खरेदी करताना लकी ड्रॉ साठी माहितीपत्रके भरू नका.हा डेटा गोळा करून सायबर गुन्ह्यांसाठी वापरला जाऊ शकतो.

या दिवाळीत ऑनलाईन सुरक्षित राहा

सायबर तज्ज्ञ ॲड.चैतन्य भंडारी आणि डॉ. रोहन न्यायाधीश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,सणासुदीचा आनंद घेताना ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नका — सजग राहा,सुरक्षित राहा!

सुरक्षितशॉपिंग,सायबरजागृती,फसवणूकटाळा,ऑनलाईनफसवणूक,ज्ञानप्रवाहन्यूज, दिवाळी२०२५,ChaitanyaBhandari, CyberSafety,OnlineFraudAlert, trending,Trend,marathi batmya,

Leave a Reply

Back To Top