भाऊबीजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीला सोन्याच्या अलंकारांची दिव्य शोभा

भाऊबीजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीला सोन्याच्या अलंकारांची दिव्य शोभा

पंढरपूरात दीपावलीचा उत्सव भक्तिभावाने उजळला

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ ऑक्टोबर २०२५ : दीपावलीच्या मंगलमय पर्वावर भाऊबीजेनिमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांना पारंपरिक व सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.याप्रसंगी श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पंढरपूर मंदिरात जमली होती.

मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही भाऊबीज निमित्त विठ्ठल- रुक्मिणीला पारंपरिक पद्धतीने अलंकार परिधान करण्यात आले आहेत.हे अलंकार केवळ मौल्यवान नसून त्यांच्या कलाकुसरीत प्राचीन भारतीय कलावैभव झळकते.

श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, हिऱ्याचे कंगण, मोत्याचे तुरा-तोडे, तुळशीची माळ, नवरत्न हार, तसेच आठ पदरी अष्टपैलू मण्यांची कंठी अशा वैभवशाली दागिन्यांनी अलंकृत करण्यात आले.

रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट,नवरत्न हार,मोत्याचे मंगळसूत्र,पाचूची गरसोळी, जडावाचे बाजूबंद, व तन्मणी अशा देखण्या व दैवी अलंकारांनी सुशोभित केले आहे. तसेच राधिका माता व सत्यभामा माता यांनाही नक्षीदार व पुरातन दागिन्यांनी सजविण्यात आले.या सर्व दागिन्यांची रचना अत्युत्कृष्ट कलाकुसरीची असून त्यांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आजही भाविकांना आकर्षित करतो.

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, दीपावली आणि भाऊबीज या आनंद पर्वानिमित्त दरवर्षी प्रमाणेच हजारो भाविक श्रींचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरात हजेरी लावत आहेत.

Leave a Reply

Back To Top