ऑपरेशन सिंदूर ने दाखवली भारताची समुद्री ताकद- संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा भारतीय नौदलाला सलाम
ऑपरेशन सिंदूर – भारताच्या इच्छा शक्तीचा आणि सामर्थ्याचा तेजोमय संदेश
समुद्रीशक्तीचा सागर – भारतीय नौदलाची उपस्थिती : मित्रांसाठी दिलासा,शत्रूंसाठी धास्ती
आत्मनिर्भरनौदल – स्वदेशी तंत्रज्ञानातून साकारतेय नवी समुद्री ताकद
नवी दिल्ली,दि.२३ ऑक्टोबर : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या नौदल कमांडर्स परिषदेचे उद्घाटन करताना भारतीय नौदलाच्या शौर्य, सजगता आणि रणनीती कौशल्याचे मनापासून कौतुक केले. त्यांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचा विशेष उल्लेख करत सांगितले की,या मोहिमेदरम्यान भारतीय नौदलाने अशी भयप्रद प्रतिबंधक भूमिका निर्माण केली की पाकिस्तान नौदलाला बंदरातच राहावे लागले.

ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्तीचे आणि क्षमतेचे प्रतीक आहे. हे जगाला स्पष्ट संदेश देते की भारत प्रत्येक आव्हानाला समर्थपणे उत्तर देण्यास सदैव तयार आहे – संरक्षणमंत्री राजनाथसिंह
संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, भारतीय महासागर प्रदेशात भारतीय नौदलाची उपस्थिती ही मैत्रीपूर्ण राष्ट्रांसाठी दिलासा तर अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी अस्वस्थता निर्माण करणारी आहे.

संरक्षणमंत्र्यांनी नौदलाच्या तांत्रिक प्रगती, समुद्री गुप्तचर व्यवस्थापन व मानवतावादी मोहिमा यांचेही कौतुक केले.त्यांनी सांगितले की,भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान स्वीकारत भारताला प्रादेशिक सुरक्षादाता राष्ट्र बनविण्याचा निर्धार केला आहे.
नौदल कमांडर्स परिषद ही भारतीय नौदलाची महत्त्वाची द्वैवार्षिक बैठक असून, या माध्यमातून देशाच्या समुद्री संरक्षण, आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयक धोरणांचा आढावा घेतला जातो.

राजनाथसिंह यांनी शेवटी सांगितले की, भारत सरकार समुद्री स्वातंत्र्य, नियमाधारित व्यवस्था आणि प्रादेशिक सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतीय नौदलाला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी कटिबद्ध आहे.