मंगळवेढ्यात मतदानादरम्यान राजकीय वादातून १६ जणांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; दगड व लोखंडी सळईने मारहाण
मंगळवेढा तालुक्यात मतदानादरम्यान राजकीय वादातून १६ जणांनी तरुणावर दगड व लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला केला.मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News mangalwedha: मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील मुढवी गावात मतदानाच्या दिवशी राजकीय वादातून गंभीर स्वरूपाचा हिंसक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.मतदानासाठी जात असलेल्या तरुणावर तब्बल १६ जणांनी एकत्रितपणे प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उमेश दत्तात्रय ठेंगील वय ३२, व्यवसाय – शेती, रा.ठेंगील वस्ती,मुढवी, ता. मंगळवेढा यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जि.प. प्राथमिक शाळा, मुढवी येथे ही घटना घडली.

फिर्यादी उमेश ठेंगील हे मतदान करण्यासाठी जात असताना नवनाथ मारुती रोकडे याने त्यांना अडवून तु राजकारणात फार मध्ये मध्ये करतोस, तुला मतदान करू देणार नाही,असे म्हणत दमदाटी केली.त्यानंतर चंद्रकांत सखाराम कदम याने शिवीगाळ केली.याच वेळी इतर आरोपींनी एकत्र येत फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीदरम्यान नवनाथ रोकडे याने जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर व कपाळावर मारून गंभीर जखमी केले.फिर्यादीला वाचवण्यासाठी ब्रम्हदेव चांगदेव क्षिरसागर हे मध्ये पडले असता अमोल विजय रोकडे याने लोखंडी सळईने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांनाही जखमी केले.
भांडण सोडविण्यासाठी आलेले आप्पा शिवाजी कोळेकर, प्रशांत श्रीकांत ठेंगील, अतुल सुभाष ठेंगील व खंडू सिद्धेश्वर माने यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली व तुला जिवंत ठेवणार नाही,अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 83/2026 अन्वये BNS कलम 118(1), 126(2), 189(2),190,191(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात दगड व लोखंडी सळई ही हत्यारे वापरण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
पो.हेड कॉं.श्री मुसळे यांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मतदानाचे दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





