‘टीटीपी’चा पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; पाच जवान ठार
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तानच्या भागात शनिवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलाचे पाच जवान ठार झाले. यातील चार जवान फ्रंटिअर कोरचे आहे. तर, अन्य एक जवान लेव्हिस फोर्सचा उपनिरिक्षक आहे. या भागात तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत टीटीपीच्या एका कमांडरचा खात्मा करण्यात आला होता.
एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते की, पाकिस्तानमधील तालिबानी गटांसोबत शांततेबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. या तालिबानी गटातील काहीजण आमच्यासोबत चर्चा सुरू आहे. टीटीपीमधील काही गटांसोबत चर्चा सुरू असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते.