भारताच्या ताफ्यात लवकरच रशियन एस-४००; अमेरिका निर्बंध लादणार?
रशियाकडून भारत खरेदी करत असलेल्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमनंतर आता अमेरिकेकडून भारतावर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. बायडन प्रशासनाने रशियाला प्रमुख शत्रू मानले आहे. बायडन यांनी सत्ता हाती घेताच रशियासोबतच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तुर्कीनेदेखील रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी केली आहे. त्यानंतर अमेरिकेने तुर्कीवर निर्बंध लादले आहेत.
चीननेही तैनात केले एस-४००
भारताने रशियाकडून ५.४ अब्ज डॉलर एवढ्या किंमती एस-४०० एअर डिफेन्स खरेदी केला आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून हे एअर डिफेन्स सिस्टिम भारतात दाखल होण्यास सुरुवात होईल. चीननेदेखील भारतीय सीमेजवळ एस-४०० मिसाइल डिफेन्स सिस्टिम तैनात केली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या ताफ्यात एस-४०० दाखल होणे ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.
भारत रशियाकडून सर्वाधिक शस्त्रे खरेदी करतो. तर, अमेरिकेकडूनही भारत शस्त्रखरेदी करतो. अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक आणि पी-८ आय विमान भारताने अमेरिकेकडून खरेदी केले आहे.