मंदिर समितीच्या गोशाळेतील खोंडे शेतक-यांना मोफत वाटप– मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०१/१०/२०२४- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या गोशाळेतील खोंडे गरजू शेतक-यांना मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीची पंढरपूर नगरपरिषद हद्दीत यमाई तलाव येथे गोशाळा आहे.या गोशाळेत सुमारे लहान-मोठी 250 गाई-वासरे आहेत. सदर गोशाळेतील खोंडे गरजू शेतक-यांना योग्य त्या अटी व शर्तीवर पाळावयास देण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून अर्ज मागविण्यात आले होते.त्यामध्ये 20 शेतक-यांनी अर्ज दाखल होते.
दि. 30 सप्टेंबर रोजी आलेल्या अर्जाची छाननी करून ईश्वर चिट्टीद्वारे निवड करून 13 गरजू शेतक-यांना मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांच्या हस्ते 15 खोंडाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी 1 ते 2 खोंडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यावेळी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत सर्वगोड, सहायक विभाग प्रमुख मोहन औसेकर, गोशाळेतील कर्मचारी वर्ग व अर्जदार शेतकरी उपस्थित होते. सदरची प्रक्रिया मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व गोशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गोशाळेतील गाईंच्या संगोपणासाठी पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी व पुरेसा प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. आजारी गाईंची आवश्यक ती काळजी घेण्यात येते.सदर गाईंचा विमा देखील उतरविण्यात आला आहे. त्यांना चारा म्हणून पशुखाद्य, देशी ज्वारीचा कडबा, हिरवा चारा इत्यादी खाद्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी कापडी / पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या गाईंपासून मिळणा-या दुधाचा वापर श्रींच्या नित्योपचारासाठी करण्यात येतो.
गोशाळेसाठी चारा किंवा देणगी द्यायची असल्यास यमाई तलाव येथील गोशाळेच्या कार्यालयात किंवा मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.