प्रलंबित प्रकरणातील शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका शिपायाला रंगेहाथ पकडले
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०१/२०२५ :- काही केल्या लाचखोरी बंद होता होईना. रोज कुठेना कुठे लोकसेवक लाच घेताना सापडत आहेत.अशाच एका प्रलंबित असलेल्या प्रकरणात शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका शिपायाला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज संध्याकाळी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली.या प्रकरणी आरोपी लोकसेवक किशोर भगवान मोहिते, वय ३६ वर्षे,पद महसूल सहायक, नेमणूक उप विभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर रा.गट नं.४१० विसावा मंदिराच्या जवळ, वाखरी,ता.पंढरपूर जि.सोलापूर वर्ग- ३ आणि नितीन शिवाजी मेटकरी,वय ५३ वर्षे, पद शिपाई,नेमणूक उप विभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर रा. गट नं. ७५/१ गणपती नगर,पंढरपूर ता.पंढरपूर जि. सोलापूर वर्ग-४ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

यातील तक्रारदाराच्या शेत जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल होती.यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५५ हजार स्विकारण्याचे मान्य केले होते.त्यानुसार आज संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख 55 हजार रुपये स्विकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहात पकडण्यात आले.आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता.१३ ते १७ जानेवारी या दरम्यानपासून आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते. आज अखेर सायंकाळी सहा वाजणेच्या दरम्यान स्वतः च्या कार्यालयातच लाच स्विकारताना ते सापडले.या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदाराला लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयातच आरोपींनी बोलवले होते. यातील आरोपी लोकसेवक शिपाई नितीन मेटकरी याने कार्यालया मध्येच ५५ हजार रुपये मोजून घेतले.रक्कम मोजून झाल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला.आरोपी पळून जाऊ नयेत म्हणून कार्यालयातील सर्व गेट बंद करण्यात आले होते.आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी थेट आपल्या कार्यालयाचाच वापर केल्याने खळबळ माजली आहे.
यातील तक्रारदार शेतजमीनीतील वाटेकरी म्हणून शेती पहात असून सदर शेतजमीनीच्या मूळ मालकाने मंडल अधिकारी खर्डी ता.पंढरपूर जि.सोलापूर यांचेकडे अर्ज दाखल केला होता, तो अर्ज हरकत घेवून नामंजुर करण्यात आला असता त्या आदेशाविरूध्द मूळ शेतजमीन मालक यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे अपिल दाखल केले होते.सदर अपिलाचा मूळ मालकाच्या वतीने तक्रारदार हे पाठपुरावा करीत होते. सदर अपिलाचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने लावण्यासाठी यातील आरोपी क्र. ०२ यांनी आरोपी क्रमांक ०१ यांचेकरीता व स्वतःकरीता ६०,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ५५,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य करून यातील आरोपी क्रमांक ०२ यांनी सदरची रक्कम स्वतः स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, दोन्ही आरोपी लोकसेवक यांचेवर पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक लाप्रवि शिरीष सरदेशपांडे पुणे,अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि डॉ. शीतल जानवे/खराडे पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.गणेश कुंभार सोलापूर सापळा पथक पोलीस निरीक्षक लाप्रवि गणेश पिंगुवाले सोलापूर,पोलीस अंमलदार एएसआय सायबण्णा कोळी,पो.ना.संतोष नरोटे, पो.कों.गजानन किणगी,पो.कों. सचिन राठोड, चालक पो.ह.राहुल गायकवाड सर्व नेमणुक ॲन्टी करप्शन ब्यूरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात आहे की,भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवका बद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर,
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल – www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार ॲप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८

