व्हीजेएनटी,ओबीसी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरच वितरित होणार – डॉ.नीलम गोऱ्हे
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ अदा करण्याचे दिले निर्देश
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२५: व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील सहामाहींच्या शिष्यवृत्तीचा निधी अद्याप वितरित न झाल्याने OBC-VJNT Students Organisation महाराष्ट्राकडून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यानंतर डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ शिष्यवृत्ती वितरित करण्याबाबत संबंधित विभागास स्पष्ट निर्देश दिले असून, शिष्यवृत्ती लवकरच मिळेल,असे स्पष्टीकरण विभागाने दिले आहे.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार:
१. १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील शिष्यवृत्तीसाठी १२६ कोटी रुपये आवश्यक असून, सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ती रखडली आहे.वित्त विभागा कडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
२. १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील शिष्यवृत्ती सर्व पात्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे.
३. १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीसाठी आवश्यक निधी बहुजन कल्याण विभागाकडे उपलब्ध असून जुलै २०२५ च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात ती अदा केली जाणार आहे.
OBC-VJNT Students’ Organisation च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शासनाच्या निर्णय प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी व प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे सांगून तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली होती.डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून निधी वितरण प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले.