सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न
नागपूर ,दि.२२/०६/२०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये संभाव्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करता, संबंधित बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या विकासास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. लवकरच त्यासाठी डीपीआर तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई,गुजरात,पालघर, पुणे,अहिल्यानगर,छत्रपती संभाजीनगर, धुळे अशा प्रमुख मार्गांनी नाशिककडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यामुळे या मार्गांच्या सक्षमीकरणासोबतच नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.अ कुंभमेळ्यातील प्रचंड वाहतूक भार लक्षात घेता या मार्गांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, काम पूर्णत्वास नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विस्तारित रस्त्यांमुळे भाविकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर यात्रा सुनिश्चित होईल. विशेषतः द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. याशिवाय, नाशिक ते त्र्यंबक हा मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे आणि नाशिक रिंगरोडलाही मंजुरी देण्यात आली आहे.
बैठकीत खालील मार्गांच्या सक्षमीकरणावर निर्णय घेण्यात आला:
घोटी – पाहिने – त्र्यंबकेश्वर – जव्हार फाटा
द्वारका सर्कल – सिन्नर (IC 21, समृद्धी महामार्ग) – नांदूर शिंगोटे – कोल्हार
नाशिक ते कसारा
सावली विहीर (IC 20, समृद्धी महामार्ग) – शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा
नाशिक ते धुळे
त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
सावली विहीर – मनमाड – मालेगाव
घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
शनिशिंगणापूर फाटा – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री गिरीष महाजन, खा.स्मिता वाघ,आ. देवयानी फरांदे,आ.मंगेश चव्हाण व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.