पुलंचा वारसा जपणारे डॉ. आशुतोष जावडेकर सर्जनशील लेखक : डॉ. नीलम गोऱ्हे

द्वंद्वाची उत्तरे मिळतात तेच खरे प्रभावी साहित्य : डॉ.नीलम गोऱ्हे

पुलंचा वारसा जपणारे डॉ.आशुतोष जावडेकर सर्जनशील लेखक : डॉ.नीलम गोऱ्हे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव

संगत प्रतिष्ठान आयोजित काव्य प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) ॲड.प्रमोद आडकर,डॉ.आशुतोष जावडेकर,डॉ.निलम गोऱ्हे,डॉ. राजा दीक्षित,मैथिली आडकर

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०७/२०२५ : माणसाच्या मनातील द्वंद्वाची उत्तरे जेव्हा साहित्यातून सापडतील तेव्हाच ते साहित्य अधिक प्रभावी ठरेल,असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. संगीतकार,कवी गीतकार,लेखक, डॉक्टर असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या डॉ.आशुतोष जावडेकर यांनी राजकीय पार्श्वभूमी असूनही स्वत:ची सर्जनशीलता जपली आहे; त्यांचे लिखाणही प्रभावी आहे. ते खऱ्या अर्थाने पु. ल.देशपांडे यांचा वारसा जपणारे आहेत,असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य प्रतिभा पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी डॉ.आशुतोष जावडेकर यांचा आज दि.13 डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे अध्यक्षपदा वरून बोलत होत्या.ज्येष्ठ विचारवंत लेखक, कवी डॉ.राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती.रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते.सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तरुण पिढीमुळे सामाजिक-राजकीय परिवर्तन होत असल्याचे सांगून डॉ.निलम गोऱ्हे म्हणाल्या,पुस्तक हेच प्रभावी माध्यम आहे इतर माध्यमे नाहीत, अशी सध्याची परिस्थिती नाही.समाजमाध्यमेही प्रभावी आहेत.समाजमाध्यमांद्वारे अर्थपूर्ण संवाद झाला पाहिजे.परस्परातील संवाद कमी झालेला असताना तो वाढविण्यासाठी रंगत-संगत प्रतिष्ठान विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी ॲड.प्रमोद आडकर यांचे कौतुक केले.

ट्रोलिंगसाठी टोळ्या…

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त वातावरण वैचारिक आणि आनंददायी असल्याने सभात्यागाची भीती नाही, असे डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.समाजमाध्यमावरील ट्रोलिंगच्या मुद्द्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ट्रोलिंग करण्यासाठी राजकारण्यांनी टोळ्या केल्या आहेत.त्या एक-दोन दिवस ट्रोल करतात पैसा संपला की थांबतात मी मात्र अशा प्रकारापासून दूर आहे.

समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर

संतसाहित्यामुळे कवितेची ताकद कळल्याचे सांगून सत्काराला उत्तर देताना आशुतोष जावडेकर म्हणाले की, श्रवणसुखाच्या मांडवात संगीतकार भेटले, काव्याला चाली देताना कवी भेटले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि शेक्सपिअर साहित्याच्या क्षेत्रातील गुरू आहेत. सध्याच्या काव्यप्रांतावर टीका करताना डॉ.जावडेकर म्हणाले,काव्याच्या व्यासपीठावर हिणकस प्रकार सुरू आहेत. त्या मानाने समाजमाध्यमांवरील कविता चांगल्या आहेत. संपादनाचा अभाव असला तरी अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाल्याचे जाणवते आहे. गीत, काव्य लिखाणाप्रमाणेच गद्य लिखाणातही लय असावी लागते. काव्य लिखाण हे शास्त्रच आहे ते जर पेलता आले नाही तर विस्फोटक ठरू शकते. कविता जगता आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

साहित्याच्या क्षेत्रातील डॉ.आशुतोष जावडेकर यांची कामगिरी अष्टपैलू असून त्यांना शब्द, सूर आणि लय त्यांना सापडली असल्याचे डॉ.राजा दीक्षित म्हणाले.

सुरुवातीस ॲड.प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या कवि संमेलनात बंडा जोशी, प्रमोद खराडे, माधव हुंडेकर, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी,स्वप्नील पोरे,सुजित कदम,विजय सातपुते,डॉ.मृदुला कुलकर्णी – खैरनार यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित काव्य प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, डॉ. आशुतोष जावडेकर,डॉ.निलम गोऱ्हे,डॉ. राजा दीक्षित,मैथिली आडकर.

Leave a Reply

Back To Top