माणच्या मातीतील माणसांच्या रक्तातच संघर्ष – अक्षय सोनवणे
महसूल प्रशासनात कार्य करीत असताना आपल्या कामाचा सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे-नितिन दोशी
अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची पहिली थाप ही नितिन दोशी देत असतात -जी डी मासाळ सर

म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-म्हसवड ता.माण जिल्हा सातारा येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये गुणवंतांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना माणच्या मातीतील माणसांच्या रक्तातच संघर्ष आहे असे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांनी केले.
येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये एम पी एस सी परीक्षेमध्ये यश संपादन करून महसूल सहाय्यक या महत्वाच्या पदावर नेमणूक झाल्याबद्दल सचिन दिलीप लोखंडे व प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम आल्याबद्दल शंभूराज दिपक मासाळ यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षस्थानी असणाऱ्या अक्षय सोनवणे यांचा शाल भेटवस्तू व फेटा घालून स्वागत करण्यात आले.उपस्थित पालक व नागरिकांचे श्रीफळं देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सचिन लोखंडे व शंभूराज मासाळ यांचा शाल फेटा व भेटवस्तु एपीआय अक्षय सोनवणे यांचे हस्ते देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ज्ञानवर्धिनी हायस्कुल चे माजी प्राचार्य जी डी मासाळ सर म्हणाले कि अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची पहिली थाप ही नितिन दोशी देत असतात आणि विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा घेऊन पुढील यश गाठताना फारशी दमछाक होत नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत कि नितिनभाई दोशी यांनी प्राथमिक सत्कार घेतलेले अनेक गुणवंत विद्यार्थी आज अधिकारी बनलेले आहेत.

शंभूराज मासाळ चे वर्ग शिक्षक श्री बिरादार सर म्हणाले की माण तालुक्यातील म्हसवड भागातील मुलांचे अध्ययन क्षमता प्रचंड कमालीची आहे यांना एकदा शिकवल्यानंतर पुन्हा ती गोष्ट शिकवण्याची गरजच भासत नाही.नितिन दोशी यांनी माझ्या विद्यार्थ्याचा सत्कार घेतलाच पण माझा सत्कार माझ्या विद्यार्थ्यामुळे होतोय याने माझी छाती भरून आली आहे. अहिंसा आणि नितिन दोशी यांचे सत्कारामुळे अनेक शंभूराज या भागात घडतील यात तिळमात्र शंका नाही.
अहिंसा पतसंस्थेचे कुटुंब प्रमुख व म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी म्हणाले की, महसूल प्रशासनात कार्य करीत असताना आपल्या कामाचा सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे.त्यांना त्रास न होता लोकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करावा तसेच सत्कार घेण्यामागे आपल्या समाजातील लोकांना आपल महत्व समजावं व त्यांनी प्रेरणा घेऊन तसे यश संपादन करावे हाच उद्देश असतो. शंभूराज ने आजच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन एक मोठा अधिकारी व्हावे हीच सदिच्छा.

म्हसवड पोलीस स्टेशन चे एपीआय अक्षय सोनवणे म्हणाले की,मी या भागात आल्यापासून पाहतोय या तालुक्यात संघर्ष करण्याची परंपरा आहे. येथील लोकांच्या धमण्यामधून जे रक्त वाहतय त्या रक्तातच संघर्ष आहे आणि मला अभिमान वाटतो अशा संघर्षमय लोकांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली.नितिन काकांचे कार्य वाखानण्याजोगे आहे. त्यांच्यामध्ये असलेले दातृत्व हे सर्वामध्ये नसते त्यांच्या आदर सत्कारामुळे विद्यार्थ्यामध्ये यश मिळवण्याची जणू भूकच निर्माण होते.
ते पुढे म्हणाले की,आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते राबवत असतात. अनेक उपक्रम समजोपयोगीच असतात आणि यातून समाजाचा उद्धारच होत असतो.सचिन लोखंडे व शंभूराज मासाळ यांचे यश म्हणजे माण तालुक्याचा असलेला त्यांचे रक्तात असलेला संघर्ष स्पष्ट करून देतो.
यावेळी ऍड.भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गोपनीय अधिकारी श्री.भादुले, निलेश सरतापे, गजानन फडतरे, शशिकांत ढोले,सौ.कीर्ती मासाळ तसेच संस्थेचे संचालक प्रीतम शहा, व्यवस्थापक दिपक मासाळ, संस्थेचे कर्मचारी व अधिकारी, आणि म्हसवड मधील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.आभार नीरज व्होरा यांनी मानले.

