इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर

इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर…

वारसा वृक्षांचे रोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण पुरस्काराचे वितरण,परकीय तणांचे उच्चाटन, हरित विचारांची पेरणी

पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,​दि.१७/०७/२०२५- देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते, तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रातील विठ्ठलभक्तांचं हे श्रद्धास्थान. शेकडो वर्षांची देदिप्यमान, वैभवशाली परंपरा जपणाऱ्या वारकरी, शेतकरी, कष्टकरी या अनोख्या वारीत देहभान हरपून टाळ, मृदुंगाच्या गजरात विठू माऊलीच्या व संतांच्या नामस्मरणात तल्लीन होत लाखोंच्या संख्येत सहभागी होतात आणि सरतेशेवटी पांडुरंगाच्या-विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून, ती मानवी मनाला शांती, आनंद आणि एकात्मतेची अनुभूती देणारी एक प्रक्रिया आहे. पंढरीच्या पालखी मार्गावरील महत्वपूर्ण विसावे आहेत, वारीदरम्यान विश्रांतीसाठी आणि प्रवचन-कीर्तनाच्या माध्यमातून वारकऱ्यांचे आणि विसावा परिसरातील शहर, गाव-खेडे भागातून येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन, वैचारिक देवाण-घेवाण करण्याचे हे एक महत्वपूर्ण स्थान आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील इंदापूर ठिकाणी असलेले पालखीस्थळ हेदेखील वारीपरंपरेतील अतंत्य महत्वाचे स्थान आहे.

​देहू-आळंदी-पंढरी परतीची वारीचे औचित्य साधून व विसाव्यांचे वारीमार्गावरील महत्व-पार्श्वभूमी लक्षात घेता या विसावास्थळी वारकरी संप्रदायात अतंत्य पूज्य मानले जाणारे देववृक्ष अर्थात अजानवृक्ष, सुवर्ण पिंपळ व नांद्रुक वृक्षांच्या रोपांचे रोपण, वारसा वृक्षांची श्रीराम मंदिर ते इंदापूर पालखी विसावा स्थळापर्यंत वृक्षदिंडी, वृक्ष-सेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सौ.सायराभाभी आतार व वृक्ष संजीवनी परिवार इंदापूर सदस्य यांना देण्यात येणारा पर्यावरण सेवा पुरस्कार, वारकऱ्यांची चरणसेवा करणारे जय इस्टीट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे अध्यक्ष जयवंत नायकुडे व सहकारी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा नागरी सन्मान, महाराष्ट्रातील सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा वृक्षाबाबत व्याख्यान, सुवर्ण पिंपळ बीजप्रसाद वाटप आणि पालखी विसावा परिसरातील उपद्रवी परदेशी (आगंतुक) तणांचे उच्चाटन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवार दि.२० जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी स्थळ इंदापूर येथे बायोस्फिअर्स संस्था; माऊली हरित अभियान व वृक्ष संजीवनी परिवार इंदापूर व इतर महत्वाच्या सहभागी संस्था जसे की जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव समिती इंदापूर, बायोस्फिअर्स संस्था, वृक्ष संजिवनी परिवार इंदापूर, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि), नागरी संघर्ष समिती इंदापूर, जय नर्सिंग इस्न्टिट्यूट इंदापूर, पतंजली योग समिती इंदापूर, युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर, शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट इंदापूर, समस्त वारकरी संप्रदाय इंदापूर, श्रावण बाळ अनाथ आश्रम, ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर, संत कबीर वसतिगृह इंदापूर, श्रीदेवी वरसुबाई वसतिगृह इंदापूर, सायकल क्लब इंदापूर, मॉर्निंग ग्रुप इंदापूर, राष्ट्रसेवा दल इंदापूर, स्वामी समर्थ संस्था इंदापूर आणि पंचक्रोशीतले ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आणि सहभागातून होणार आहे. सदर पर्यावरणाच्या या अनोख्या सोहळ्याला पर्यावरणप्रेमी, वारकरी संप्रदाय, संशोधक, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि जनसामान्यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी या पर्यावरण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Back To Top