मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० जुलै २०२५ : मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा,ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा,पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करत लोकचळवळ तयार करावी,असेही त्या म्हणाल्या.

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा या कृतीशाळेचे आयोजन राज्य महिला आयोगाच्यावतीने रूपाली चाकणकर यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे केले होते.जागतिक मानवी तस्करीविरोधी दिना निमित्त हा उपक्रम पार पडला.यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासह पशुसंवर्धन व पर्यावरणबदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह निर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर,सर्वश्री व श्रीमती आमदार प्रज्ञा सातव,श्रीजया चव्हाण,मनिषा कायंदे, हारून खान,सना मलिक,मोनिका राजाळे आणि आयोगाच्या सदस्या सचिव नंदीनी आवाडे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग यंत्रणांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी,विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी विदर्भातील ‘ व्यवसायिक लैंगिक शोषण अन्वेषण अहवाल व समस्या,मदत, कायदे काय सांगतात’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.देशभरातील तज्ज्ञांनी या परिसंवादात सहभाग घेतला.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सजग व सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे.शासन या लढ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.तस्करी विरोधातील लढ्यात तंत्रज्ञानाचा वापर करून दोषसिद्धी वाढवणे शक्य आहे. प्रत्येक जिल्ह्याने शाश्वत विकास उद्दिष्टे यानुसार ३ टक्के निधी यासाठी वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी मानवी तस्करी झालेल्या मुलींनी यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:ला कसे घडवले,पुढे नेले याची उदाहरणे दिली.

प्रथम परिसंवादात तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजना आणि मॉडेल्स यावर चर्चा झाली.यात ज्ञानेश्वर मुळे (माजी सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग),स्टँक टेक्नोलॉजीचे संस्थापक अतुल राय, प्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलर आणि सायबर पीस फाउंडेशनचे इरफान सिद्धावतम यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रयास संस्थेच्या शॅरॉन मेनेझेस यांनी केले.

दुसऱ्या सत्रात ‘प्रवासा दरम्यान आणि ऑनलाइन माध्यमातून होणारी तस्करी’ या विषयावर चर्चा झाली.रेल्वे स्थानकं, महामार्ग,बस डेपो,फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप,एक्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर तस्करी ओळखण्याचे आणि रोखण्याचे उपाय यामध्ये मांडण्यात आले. परिवहन क्षेत्र, कायदेशीर तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था,पोलीस अधिकारी यांनी समन्वय व सुधारणा यावर आपले विचार मांडले.

डॉ.नीलम गोऱ्हे यांचे स्पष्ट मत होते की, मानवी तस्करी विरोधातील लढा केवळ कायद्याने नव्हे तर संवेदनशीलतेने आणि सामूहिक कृतीने लढायचा आहे.

Leave a Reply

Back To Top