पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे
ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
आढावा बैठकीत १९ मागण्यांना हिरवा कंदील

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे यासाठी प्रथम प्राधान्य देत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासमवेत मुंबईत आढावा बैठक घेत ऊर्जा विभागाशी संबंधित विविध मुद्द्यावर चर्चा केली.यात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांतील विविध विद्युत कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. सदरच्या आढावा बैठकीत विविध मागण्या बाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे -बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदरच्या मागण्यांच्या कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने मतदारसंघातील महावितरण व महापारेषण विभागाकडील मंजूर तसेच प्रलंबित कामाबाबत हिरवा कंदील दाखवला आहे.

पंढरपूर शहराचा वाढता आलेख लक्षात घेता काही नवीन कामे उभा करणे गरजेचे आहे तसेच शहरात वर्षाकाठी भरणार्या चार यात्रांमध्ये भाविकांना महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशाबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदारसंघांमध्ये ज्या शेतकऱ्यांना सोलर पाहिजे आहे त्यांना सोलर वर कनेक्शन व ज्यांना विजेचे कनेक्शन पाहिजे आहे त्यांना विजेचे कनेक्शन दिले जावे., मतदार संघामध्ये ओव्हरलोड असलेल्या सब स्टेशनमध्ये अतिरिक्त ट्रांसफार्मर बसवण्यात यावेत. मतदार संघांमध्ये मुख्यमंत्री सोलर योजनेची कामे चालू आहेत व आरडीएसएस या कामांना गती देण्यात यावी.मतदारसंघा मध्ये शासनाच्या निरंतर योजनेतून जे ओव्हरलोड ६३ चे ट्रांसफार्मर आहेत त्या ठिकाणी शंभर चे ट्रांसफार्मर बसवण्यात यावे यासाठी लागणाऱ्या निधीची ही मागणी यावेळी करण्यात आली.

पंढरपूर शहरासाठी चंद्रभागा नदीपात्रामध्ये असलेली ११ केवी उच्च दाबाची लाईन घाटाच्या बाजूने अंडरग्राउंड टाकण्यात यावी.गोपाळपूर येथील दर्शन रांग शेजारील पत्रा शेड येथे ३३ केवी सब स्टेशन असावे. तसेच वाखरी पालखी तळावरसुद्धा ३३ केवी सबस्टेशन असावे.पंढरपूर सांगोला रोडवरील महावितरण येथे मोठे वर्कशॉप आहे त्या बाजूला ३३/११ सब स्टेशन उभारणे गरजेचे आहे.६५ एकर मध्ये ३३/११ सबस्टेशन उभारणे.पंढरपूर परिसरामध्ये ४०० केवीचे सब स्टेशन उभारण्यात यावे.महापारेषण चे सोलापूर येथे सर्कल ऑफिस असून त्याचे विभाजन करून पंढरपूर येथे सर्कल ऑफिस उभारण्यात यावे.

मंगळवेढा शहर व तालुक्यासाठी यड्राव आणि कचरेवाडी येथे ३३/११ सबस्टेशन उभारणे.मंगळवेढा शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणाहून वीजपुरवठा करण्याची सोय नाही त्यामुळे त्यासाठी दुसरी नवीन वाहिनी टाकण्यात यावी.मंगळवेढा तालुक्यात विभागीय कार्यालय उभारण्यात यावे.नंदुर सब स्टेशनचे काम संथगतीने केले असल्यामुळे संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना राज्यमंत्री यांनी दिल्या.मंजूर असलेले लक्ष्मी दहिवडी मंगळवेढा शहर,मरोळी,गोपाळपूर, विठ्ठल मंदिर येथे सब स्टेशनचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. निंबोणी येथे १३२ केवीचे सब स्टेशन उभा केले आहे त्यावर लोड नसून दक्षिण भागातील सब स्टेशनचा लोड त्यावर टाकण्यात यावा.मंगळवेढा शहर व एमआयडीसी भागांमध्ये वीस जाण्याचे व वीज दाब कमी जास्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे तरी त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी आदी मागण्या राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या कडे मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे केल्यानंतर सर्व मागण्या मान्य करत सर्व विषयावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित विभागातील अधिकारी यांना दिल्या आहेत.

