भोसे प्रादेशिक व ४० गावे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आ समाधान आवताडे यांनी घेतला आढावा

भोसे प्रादेशिक व ४० गावे पाणीपुरवठा योजनांसंदर्भात आ समाधान आवताडे यांनी घेतला आढावा

पाणीपुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या सदर योजनांच्या योग्य कार्यवाहीसाठी आ आवताडे यांनी दिल्या सूचना

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण अशा चाळीस गाव व भोसे पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी मंगळवेढा शहरातील पंचायत समिती कार्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेत या योजनेचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील चाळीस गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २०१७ साली ४० व भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.मात्र कामाच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे आजही त्या ४० गावांपैकी १५ ते २० गावांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळते तर उर्वरित गावांना कमी दाबाने किंवा अजिबात पाणी मिळत नाही. काही गावांना तर आजपर्यंत पाणी मिळालेलेच नाही, ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे.

सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी, येळगी, लेंडवे चिंचाळे या गावांच्या सरपंचांनी सध्या देखील पाणी मिळत नसल्याची तक्रार केली.रेड्डे गावच्या सरपंचांनी गढूळ पाणी येत असल्या बाबत माहिती दिली.उचेठाण येथे जॅकवेल असून एकूण तीन पंप बसवले आहेत. त्यापैकी दोन पंप सुरू ठेवून एक पंप स्टँडबाय ठेवणे अपेक्षित असतानाही, सध्या दोनही पंप निकामी असून फक्त एकच पंप सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा पुरवठा अपुरा होत आहे. या संदर्भात मेकॅनिकल विभागातील व्हटकर यांना दोन्ही पंप तातडीने दुरुस्त करण्याच्या आमदार समाधान आवताडे यांनी सूचना दिल्या.

जुनोनी फिल्टर टाकी येथे सोलर युनिटचे काम पूर्ण झाले असून जोडणी अद्याप झालेली नाही.ही जोडणी येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.अनेक गावांच्या सरपंचांनी पाईप जमिनीच्या खूप वर असल्यामुळे गळती होत असल्याची तक्रार केली.त्यासंबंधी ४० गावांतील सर्वेक्षण करून किती गावांना पाणी मिळते आणि किती गावांना मिळत नाही याचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले.आवश्यक असल्यास दुरुस्ती किंवा नवीन पाईप टाकण्याचा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले.या योजनेतील थकित बिलाबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी शासनाकडून सर्व वीज बिल माफ करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आमदार आवताडे यांनी आश्वासन देखील दिले.

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता काटकर, पाणीपुरवठा विभाग तांत्रिक अधिकारी व्हटकर, महावितरण विभागचे आसबे, गायकवाड, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती सुरेश ढोणे,सरपंच मछिंद्र खताळ यांच्या सह इतर प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी त्याचबरोबर विविध गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top