तेलगाव व डोणगाव पुलाची पाहणी – खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाचे तातडीने उपाययोजनेचे आश्वासन
उत्तर सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० ऑगस्ट २०२५ – खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या सूचनेनुसार उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील सीना नदीवरील पुलाची तसेच डोणगाव येथील नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पुलाची पाहणी करण्यात आली.

अंत्रोळी, वडापूर,गुंजेगाव,अकोले मंद्रूप, शंकरनगर,तांडा, कंदलगाव आदी गावांतील नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पूरकाळातील अडचणी मांडल्या होत्या.त्यांनी सांगितले की, पूर आल्यावर तेलगाव येथील सीना नदी वरील पूल वाहतुकीस बंद होतो तर डोणगाव येथील चुकीच्या रचनेमुळे नव्याने बांधलेला पूल वापरात येत नाही व बाजूच्या रस्त्या वरून पाणी शिरल्यामुळे सोलापूरकडे जाणारा मार्ग बंद होतो.
सध्या खासदार प्रणिती शिंदे दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांनी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव,जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, स्वीय सहाय्यक समाधान हाके व बंटी चंदनशिवे यांना प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.

या पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तेलगाव पुलाची उंची वाढवणे अथवा नवीन पूल उभारणे तसेच डोणगाव पुलावरील चुकीच्या बांधकामा बाबत लेव्हलनुसार तातडीने उपाययोजना करणे अशा खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनांची माहिती प्रणिती शिंदे टीमने दिली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशन संपल्यानंतर स्वतः प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी, वडापूर, गुंजेगाव, अकोले मंद्रूप, शंकरनगर, कंदलगाव या गावांतून तेलगाव–डोणगाव मार्गे सोलापूरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल,असे खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीमने नमूद केले.
या पाहणीदरम्यान भारत जाधव,मनोज यलगुलवार,समाधान हाके,बंटी चंदनशिवे यांच्यासह तेलगाव,डोणगाव,अकोले मंद्रूप, गुंजेगाव,कंदलगाव या गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

