गरुडझेप मोहीम-शिवचातुर्य दिन या टपाल विशेष आवरणाने छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास जगभरात १७ ऑगस्ट १६६६ शिवचातुर्य दिनाला शासनाची अधिकृत मान्यता
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासातील सर्वाधिक महत्वाची आणि लक्षवेधी घटना म्हणजे महाराज आणि औरंगजेबाची आग्रा भेट आणि महाराजांची आग्र्याहून सुटका होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ ला आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून स्वतःच्या बुद्धिचातुर्याने शंभूराजेसह सुटका करून राजगडाकडे घेतलेली गरुडझेप म्हणजेच शिवचातुर्य दिन होय.त्यामुळे या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात आणि एकुणातच भारत देशाच्या परंपरेत विशेष आदराचे स्थान आहे.राजांच्या या अतुलनीय पराक्रमाला अभिवादन,या गौरवशाली इतिहासाचे स्मरण म्हणून व आजच्या तरुण पिढीपर्यंत मराठ्यांचा हा जाज्वल्य इतिहास पोहचवण्यासाठी गरुडझेप मोहिमेच्या माध्यमातून आग्रा ते राजगड ही १३१० कि.मी.पायी मोहीम गेले ६ वर्षे अविरतपणे मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

दरवर्षी आग्र्याहून निघणारी हजारो मावळ्यांची पायी मोहीम व सायकल स्वारांच्या व स्थानिक जनतेच्या सहभागातून लाठीकाठीसारखे मर्दानी खेळ व शिव व्याख्यात्यांची व्याख्याने ४ राज्यातून व ७५ शहरातून सादर करत अखंडपणे शिवविचारांचा जागर करत दुर्गराज राजगडावर पोहचते. महाराजांच्या व सहकारी मावळ्यांच्या या अद्वितीय पराक्रमाला अभिवादन म्हणून व गरुडझेप मोहिमेचे महत्वाचे शिवकार्य लक्षात घेता भारत सरकारच्या टपाल खात्याच्या माध्यमातून, गरुडझेप मोहिम,बायोस्फिअर्स यांच्या पुढाकाराने तसेच शिवप्रेमी,गुंजवणे ग्रामपंचायत,राजगड यांच्या सहकार्याने १७ ऑगस्ट १६६६ शिवचातुर्य दिन-गरुडझेप मोहिम या टपाल विशेष आवरणाचे प्रकाशन गुंजवणे गाव,किल्ले राजगड,ता.राजगड वेल्हा येथे आज दि.२६ रोजी भोर-राजगड वेल्हा विभागाचे उप-विभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते व पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधिक्षक दि.वी.सर्जेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

त्यावेळी प्रमुख म्हणून राजगड वेल्हा तहसीलदार श्रीनिवास ढाणे, बायोस्फिअर्स चे अध्यक्ष व या विशेष आवरणाचे प्रस्तावक डॉ.सचिन पुणेकर,इतिहास अभ्यासक- संशोधक नंदकुमार मते,गुंजवणे गावाचे सरपंच लक्ष्मण रसाळ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ दारवटकर,गरुडझेप मोहिमेचे निलेश मिसाळ,आशिष पाळंदे, पुणे वनविभागाच्या अधिकारी श्रीमती दया डोणे उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्याला पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधिकारी दत्तात्रय वराडे,श्रीमती नाझनीन पठाण,विनय बेंडे,श्रीमती अनुजा मोराळे,गणेश जगताप संतोष पवार, पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ,जेष्ठ पत्रकार राहुल बांदल,लक्ष्मण शिंदे,शिवप्रेमी केदार कुलकर्णी,अमित पायगुडे,गणपत चोर- साळुंके,किसन रसाळ,कैलास निम्हण, मोहन रसाळ यांच्यासह टपाल खाते,वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते. सुत्रसंचालन दत्तात्रय गायकवाड यांनी केले.प्रास्ताविक डॉ.सचिन पुणेकर यांनी केले.आभार बाळासाहेब रसाळ यांनी मानले. सदर विशेष आवरणाची संकल्पना ही डॉ.सचिन पुणेकर व मारुती आबा गोळे यांची आहे.

याप्रसंगी मान्यवर बोलताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्ववंदनीय लोककल्याणकारी कार्याच्या स्मृतीची कीर्ती व शिवचातुर्य दिन जगभर पोहोचणार आहे. गरुडझेप मोहिमेच्या माध्यमातून शिवविचारांचा जागर राष्ट्रभर-जगभर नेण्यासाठी हे विशेष आवरण महत्वाची भूमिका बजावणार आहे.शिवाय हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी असणाऱ्या राजगड व राजगडाच्या गुंजवणे गावातून सदर विशेष आवरण प्रकाशित होणे हे देखील औचित्याचे व अभिमानाचे आहे अशा भावना स्थानिक राजगड ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

