शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – आ. समाधान आवताडे


आ.आवताडे यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

सदर निवेदनात आमदार समाधान आवताडे यांनी म्हटले आहे की,भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तसेच या भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसात झालेल्या प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे उडीद,सूर्यफूल,कांदा,मका यासह इतर पिके पाण्यात असून या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.पूर अतिवृष्टी मुळे या भागातील घरांचे तसेच नदीवरील बंधाऱ्याचे आजूबाजूंचे भरावे वाहून गेल्यामुळे रहदारीस व वाहतुकीस मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. भीमा नदीकाठावरील भागात भीमा नदीचा पूर अतिवृष्टी यामुळे या भागातील घरे,पिके, जनावरांचे गोठे रस्ते तसेच महावितरण यांच्या वीज व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच पंढरपूर शहरातील नागरिक यांचेही या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या परिस्थितीतून त्यांना दिलासा देण्यासाठी घरे, पिके,जनावरे गोठे याचे त्वरित पंचनामे होणे. लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे त्याबाबत संबंधित बाधित माझ्याकडे वारंवार मागणी करत आहेत यामुळे पूर अतिवृष्टीमुळे झालेल्या घरे, पिके जनावरांचे गोठे यांच्या नुकसानी बाबतचे पंचनामे तात्काळ करण्यासंबंधात संबंधित प्रशासकीय यंत्रणांना लवकरात लवकर आदेशित करावे अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना वेळेत दिलासा मिळावा यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी कोणताही विलंब न करता ठोस उपाययोजना राबवाव्यात,अशी स्पष्ट भूमिका आमदार समाधान आवताडे यांनी मांडली.
आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणीची जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित भागातील प्रशासकीय यंत्रणांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले आहे. त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे या पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून सर्व पात्र शेतकऱ्यांना या मदतीसाठी योग्य ती कार्यवाही करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आमदार आवताडे यांना सांगितले आहे.

