सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी

सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी

नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या आमदार आवताडे यांच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः अशोक हुगार, महेश हुगार, सुनील कोरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या उडीद व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.पिके पाण्याखाली गेल्याने त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या तसेच प्रशासनाने तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या.

आमदार समाधान आवताडे यांनी सदर भागाची पाहणी केल्या नंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत तातडीने पंचनामा करण्याच्या तसेच आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी श्री.भोसले यांच्याबरोबर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितले आहेत.त्यांनी उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील यांचीही प्रत्यक्ष भेट घेतली.

यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन शासनस्तरावरून मदत मिळावी यासाठी मी माझ्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी कटीबद्ध असेन असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांची झालेली हानी भरून काढण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी देखील आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा व तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सदैव सजग असून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार आमदार आवताडे यांनी या भेटी दरम्यान व्यक्त केला.

यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top