दैनंदिन वस्तूंवरील अवाजवी एमआरपीचा निषेध; अ.भा.ग्राहक पंचायतीची जनजागृती मोहीम वेगात

अनियंत्रित एमआरपीविरुद्ध ग्राहक पंचायतीचे आंदोलन तीव्र; पंढरपूरसह जिल्हाभर स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनंदिन वस्तूंवरील अवाजवी एमआरपीचा निषेध; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जनजागृती मोहीम वेगात

Pandhapur News:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज: दैनंदिन वापरातील वस्तूंवरील अनियंत्रित आणि अवाजवी एमआरपीविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देशव्यापी आंदोलन छेडले असून, या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हाभर नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.

ग्राहकांच्या हिताचे रक्षण आणि वस्तूंवरील अवास्तव एमआरपी नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना भेडसावणाऱ्या वाढत्या किंमती आणि एमआरपीमधील विसंगती याविरोधात जनमत तयार करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

पंढरपूर शहरातील श्री दत्त घाट परिसर, तुळशीवृंदावन परिसर, रेल्वे स्टेशन परिसर,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर,निकते मेडिकल परिसर,बस स्थानक,सावरकर पथ, हरिदास वेस,घोंगडे गल्ली,भोसले चौक यांसह अनेक भागांत नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित केल्या जात आहेत.तसेच गोपाळपूर,भाळवणी आणि इतर ग्रामीण भागांतही मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक केले जात असून बाजारातील वस्तूंवर लावल्या जाणाऱ्या अवाजवी एमआरपीविरोधात संघटितपणे आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या उपक्रमात जिल्हा सचिव सुहास निकते,उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव महेश भोसले,सहसचिव आझाद अल्लापूरकर,मंगेश देशपांडे, अमोल अभंगराव,सागर शिंदे,सागर कोळेकर,पवार,सुमित पारखे, विक्रांत कासेगावकर,किशोर शिंदे,डॉ.प्रशांत ठाकरे, संतोष उपाध्ये यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

ग्राहकांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही स्वाक्षरी मोहीम आगामी काळात आणखी व्यापक करण्याचा निर्धार ग्राहक पंचायतीने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Back To Top