आढीव गावात घरकुल योजनेत बोगस बिले काढल्याचा आरोप; ग्रामसेवक व रोजगारसेवकां विरोधात तक्रारींनंतरही कारवाईचा प्रश्न कायम
घर न बांधताच 10 हजार रुपये घेऊन बिले काढली’; आढीव गावातील कथित गैरव्यवहाराची चौकशी रखडल्याचा आरोप
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात ग्रामसेवक व रोजगारसेवक यांनी मिळून विविध शासकीय योजनांमध्ये कथित गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.घरकुल योजना तसेच अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेच्या लाभार्थ्यांकडून पैसे उकळून बोगस बिले काढल्याची तक्रार संबंधित विभागांकडे दाखल करण्यात आली असून अनेक पत्रव्यवहार होऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

तक्रारीनुसार काही ग्रामस्थांची घरे प्रत्यक्षात बांधलेली नसतानाही घरकुल योजनेअंतर्गत बिले काढण्यात आली.यासाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून मस्टर काढण्यासाठी प्रत्येकी 15 हजार रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी युवासेना पदाधिकारी समाधान गोरे यांनी पंचायत समिती पंढरपूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर तसेच इतर संबंधित विभागांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. तक्रारींची दखल घेत विविध विभागांनी चौकशीचे आदेश दिल्याचे पत्रव्यवहारातून दिसून येत असले तरी अद्यापही संबंधितांवर कोणतीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.या आरोपांमुळे आढीव गावातील शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत नक्की काय झाले आहे हे समोर येणे गरजेचे आहे.
याबाबत ग्रामसेवक व रोजगारसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.

