सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण
सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल….
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०२/२०२५ : या मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही असे म्हणत धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी वय 64 रा.सिध्दनकेरी यांना लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,ए मंजूनाथ सकलेश कोरे,भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे,संतोष रामचंद्र कोरे,सिध्दू येसाप्पा कोरे या सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी राचोटेश्वर स्वामीजी हे सिध्देनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षापासून रहावयास आहेत. यातील फिर्यादी हे तोफकट्टी संस्थानमध्ये मठपती म्हणून धर्मोपदेशनाचे काम करीत आहेत. या मठातच श्री सिध्देश्वर मंदिर ही आहे. फिर्यादीच्या सोबत सेवेत त्यांची शिष्य काशिबाई रेवणसिध्द स्वामी व शिवमुर्ती राचप्पा स्वामी हे नेहमी असतात. सिध्दनकेरी गावातील काही लोक पुजापाठ करण्या करिता तो मठ आमचा आहे असे म्हणून फिर्यादी सोबत वाद घालत असतात.दि. 3 मार्च रोजी रात्री 9 वाजता मठामध्ये खोलीत फिर्यादी झोपण्याकरिता जात असताना वरील आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली व त्यांनी मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरुन आलेला आहे तुझा येथे काहीही संबंध नाही तु बाहेर ये असे म्हणून खोलीतून बाहेर ओढत आणले.
त्यावेळी फिर्यादीने आरोपीस आपले प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही असे करु नका असे समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी न ऐकता मठातील लाईट बंद करुन फिर्यादीस लोखंडी गजाने पाठीवर,उजव्या खांद्यावर, दोन्ही मांड्यावर, नडगीवर मारुन गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.

