नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई,दि.मार्च 25, 2025:- विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्या साठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्याचे शालेय शिक्षण धोरण राबविताना मराठी भाषेचा सन्मान आणि स्थान अधिक उंचावण्यावर कटाक्षाने भर देण्यात येईल अशी ग्वाहीही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देतांना शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे बोलत होते.

महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत सदस्य रोहित पाटील, सदस्य प्रवीण स्वामी, सदस्य सिद्धार्थ खरात आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, की राज्यातील विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून त्याचे व समाजाचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी शिक्षण विभागाने या क्षेत्रात अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. शिक्षण हक्क (RTE) कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक मुलाला चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग कटीबद्ध असून यासाठी शाळेत पायाभूत व दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.

पायाभूत भौतिक सुविधांसाठी रोडमॅप तयार

शाळेमध्ये पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असून स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, वर्ग खोल्या, ग्रंथालये, वाचनालये आणि खेळाची मैदाने उपलब्ध करण्यासाठी रोडमॅप तयार केला जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, TET परीक्षेच्या आधारे गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती केली जात असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन भरती प्रक्रियेवर भर दिला जात आहे. इयत्ता ११ वीचे प्रवेश व २५ टक्के RTE प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जात आहेत.

अशैक्षणिक जबाबदाऱ्या कमी करणार

शिक्षकांना केवळ ज्ञानदानाचे काम करता यावे यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक जबाबदाऱ्या कमी करण्यात येणार आहेत. यंदा राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले आहे.

विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करणार

आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करून आरोग्य तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

कला,क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन

स्पेशल गुरुकुल योजनेअंतर्गत राज्यात ८ विशेष शाळा सुरू करण्यात येणार असून या शाळांमधून खेळाडू, विज्ञान, कला इत्यादी विषयांमध्ये विद्यार्थी घडवले जातील.

गुढीपाडवा पटसंख्या वाढवा

राज्यातील शिक्षण संस्था व शिक्षक शिक्षण क्षेत्रात सेवाभावी व समर्पित वृत्तीने काम करत असून शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी राज्यशासन खंबीरपणे उभे राहील. यावर्षी काही शिक्षकांनी गुढीपाडवा पटसंख्या वाढवा हा उपक्रम स्वतःहून सुरू केला असल्याचेही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading