चैत्र शुक्ल पौर्णिमा या दिवशी अंजनी मातेच्या उदरी महारुद्र पोटी आले. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिना थ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला
मारुतीराय हे साक्षात भगवान शिवाचे अवतार आहेत तर अंजनी माता यासुद्धा भगवान शिवाच्या फार मोठ्या भक्त आहेत आणि जिथे भक्ती असते तिथे देव असतो.अंजनी मातेच्या पोटी भगवान शंकरांनी अवतार घेतला. लहानपणा पासूनच मारुतीरायांनी चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली.सकाळी उगवता सूर्य हा त्यांना एखाद्या परीपक्व फळासारखा दिसला म्हणून सूर्यावर मारुतीरायांनी झेप घेतली.एवढी ताकद मारुतीरायांमध्ये बालवयामध्ये होती. त्याच वेळेस सूर्यदेवांची व सृष्टीचे चक्र व्यवस्थित चालावे म्हणून देवराज इंद्र देवाने आपले वज्र सोडून मारुतीरायांना भूमीवर पाडले असा भीम पराक्रम त्यांनी आपल्या बालवयामध्ये केला होता.त्याच वेळेस त्यांना पवन देवाच्या कृपेने इतर सर्व देवांनी अनेक वरदान दिल्याचे आपणास दिसून येते.
अनेक वरदान,शक्ती असताना आपल्या शक्तीचा गर्व अहंकार कधीही मारुतीरायांनी दाखवलेला नाही.या शक्तींचा दुरुपयोग कधीही केलेला नाही.आज मानवात यातील कुठलीही एखादी गोष्ट जास्त असली की लगेच मनामध्ये दुराचार निर्माण होतो. मनामध्ये तो भाव यायला नको.नम्र भाव आपल्या जीवनामध्ये असावा हे मारुती रायांचे चरित्र दाखवते. मारुतीराय शक्तिमान तर होतेच परंतु बुद्धिवान देखील होते.शक्ती, बुद्धी आणि युक्ती या गुणांसह मारुतीरायां कडे सर्वात महान जो गुण होता तो म्हणजे भक्ती. मारुतीरायांनी प्रभू रामचंद्रांना आराध्य दैवत मानले व प्रभू रामचंद्रांची भक्ती करण्यात धन्यता मानली.राम कार्यासाठी, स्वामी कार्यासाठी तत्परता काय असते व स्वामींची भक्ती काय असते ? हे आपल्याला मारुतीरायांचे चरित्र दाखवते. मारुतीराय हे जेथे राम नाम आहे तेथे तेथे उपस्थित असतात याची प्रचिती अनेकांनी घेतलेली आहे असे इतिहासामध्ये आपल्याला दाखले मिळतात.
मारुतीरायांच्या जीवनाकडे पाहिल्यास ते एक चिरंजीवी आहेत.वेगवेगळ्या युगामध्ये ते आपणास दर्शन देतानाही दिसत आहेत. आजच्या तरुण पिढींना शक्ती काय असते, बलोपासना काय असते हे समर्थ रामदासांनी गावोगावी तालीम निर्माण करून व प्रेरणा स्थान म्हणून मारुतीरायांची मंदिरे उभारलेली दिसतात. रामायणामध्ये मारुतीराय हे जेथे धर्म आहे, जेथे नितिमत्ता आहे त्या बाजूला आहेत हे दिसून येते.राजा सुग्रीव असो प्रभू रामचंद्र असो जेथे सत्य आहे तेथे मारुतीराया खंबीरपणे पाठीशी आहेत हे आपणास दिसून येते.
ज्यावेळेस सीतामाईंचे रावणाने हरण केले त्यावेळेस मारुतीरायांनी लंकेत जाण्यासाठी जी उडी घेतली ती आजही प्रसिद्ध आहे. रामायणामध्ये सुंदर असे त्याचे वर्णन केले आहे.सीतामाईंना लंकेमध्ये जाऊन आधार देऊन रावणाला प्रभू रामचंद्रांचा एक भक्त आणि त्या भक्तामध्ये काय ताकद आहे हे दाखवले.संपूर्ण लंका दहन केली व रामनामाचा डंका त्यांनी वाजवलेला आहे व सीतामाईचे दुःख दूर केले आहे.
सीता शोक विनाश चंद्रा जय बल भीमा महारुद्रा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की
ज्यावेळेस प्रभू रामचंद्र व रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले त्यावेळेस युद्धामध्ये सर्व आघाडीवर मारुतीराया असलेले आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस लक्ष्मणांना शक्ती लागली त्यावेळेस द्रोणागिरी पर्वत आणण्याचे काम मारुती रायांनी केले आहे. तसेच युद्धामध्ये अनेक कामे आपल्या युक्तीने त्यांनी पार पाडलेली आहेत त्याचबरोबर ज्या वेळेस रावण आपल्या पुष्पक विमानातून मायावी बाणांचा वर्षाव करू लागला त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना व लक्ष्मणांना आपल्या खांद्यावर बसवून युद्ध समान रेषेला आणून युद्ध केले व युद्धामध्ये विजय प्राप्त केला. एकंदरीत पाहता रामायण हे मारुतीरायांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही असे कार्य मारुतीरायांचे आहे.सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मारुती राय हे मन ताब्यात असलेले, इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहेत असे आहेत.आपले जीवन भर त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केले आहे.स्वामीभक्ति, दास्यभक्ती यांना प्राधान्य दिलेले आपणास दिसून येते. शक्ती असून अशी विनम्रता हा गुण त्यांच्याकडे असलेला आपल्याला दिसून येतो .आज तरुण पिढीने मारुतीरायांसारखे बलशाली होण्यासाठी रोज व्यायाम करण्याची गरज आहे .हा आदर्श आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. व्यसनाकडे न जाता रोज व्यायाम हनुमान दंड तसेच प्राणायाम,योगासन व नम्रता,भक्ती हा आदर्श आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो.
धन्य अंजनीचे सुत ज्याचे नाव हनुमंत, जाने सीता शोधी केली राम सीता भेटविली द्रोणागिरी आणिला लक्ष्मण वाचविला ऐसा उपकारी मारुती तुका लोळे चरणावरी
जय हनुमान जय श्रीराम -हभप सुहासकाका कुलकर्णी,पंढरपूर, मो.नं.७७५६०९६९७५