भयमुक्त,वाहतूककोंडीमुक्त आणि समृद्ध पुणे’चे वचन:एकनाथ शिंदेंच्या dcm Eknath Shinde शिवसेनेचा ‘शब्द शिवसेनेचा’ वचननामा जाहीर
पुणे महापालिका निवडणूक २०२६ साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा ‘शब्द शिवसेनेचा’ वचननामा जाहीर. वाहतूक, महिला सक्षमीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, मेट्रो विस्तार व रोजगाराच्या ठोस घोषणा.
Pune mahanagarpalika election: पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ जानेवारी २०२६ :पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचा ‘शब्द शिवसेनेचा’ हा जाहीरनामा आज उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या वचननाम्याची सविस्तर माहिती शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थितांना दिली.
डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे विकास परिषद आयोजित करून शहराची विकास ब्ल्यू-प्रिंट PuneDevelopment plan तयार केली जाईल. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून पुण्याला आधुनिक, सुरक्षित व समृद्ध शहराचे स्वरूप दिले जाईल.

शिवसेनेच्या shivsena वचननाम्यात वाहतूककोंडी मुक्त,भयमुक्त आणि समृद्ध पुणे घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार असून, गुन्हेगारीवर कठोर कारवाई करत शहर पूर्णपणे सुरक्षित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने दोन लाख महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत महिला बचत गटांना पुणे महानगरपालिकेमार्फत दरवर्षी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर शिवसेनेने मोठी घोषणा करत पुढील १० वर्षांत सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर देण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधांच्या बाबतीत मनपाच्या प्रत्येक रुग्णालयात अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण व रोजगारासाठी मनपा शाळांमध्ये कॉम्प्युटर व ए.आय. शिक्षण, ई-लर्निंग शाळांचा विस्तार तसेच ऑटोमोबाईल व ए.आय. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे मेट्रोचे जाळे लोणावळा, दौंड, खेड-शिवापूर, खडकवासला आणि पुणे विमानतळापर्यंत विस्तारण्यात येणार आहे.क्रीडा व संस्कृती क्षेत्रात बालेवाडी- म्हाळुंगे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा नगरीत दरवर्षी भव्य क्रीडा महोत्सव, मराठी संगीत रंगभूमी संग्रहालय तसेच लता मंगेशकर स्मृतीप्रित्यर्थ लता वाटिका व ओपन आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे.
मुठा नदी सुधार प्रकल्प जायकाच्या सहकार्याने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असून गणेशोत्सवाला ‘ग्लोबल गणेशोत्सव’ म्हणून विकसित करून पर्यटन व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. तसेच जुन्या वाड्यांतील भाडेकरूंना एफएसआय, वाडे दुरुस्तीसाठी विशेष निधी, पुण्याजवळ रेल्वे कार्गो हब आणि ऑटो हबसाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.





