पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने अभिरूप मतदान
संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिरूप मतदानाला संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात मतदान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर जाहीर केल्यापासून यास येथील नागरिक, व्यापारी यांनी विरोध सुरू केला आहे. या विरोधात विविध आंदोलने केली जात आहेत. दरम्यान संभाव्य बाधितांची तीर्थक्षेत्र बचाव समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीच्या वतीने शनिवार दि.14 रोजी अभिरूप पध्दतीने मतदान घेतले. कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी बचाव समितीने हे अनोखे आंदोलन आयोजित केले होते. येथील हिंदूसभा भवन येथे आयोजित मतदानास मोठा प्रतिसाद मिळाल्या असल्याचे चित्र होते. सकाळी दहा वाजल्यापासून संभाव्य बाधितांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संभाव्य बाधितांना नोटीसा बजावून केबीपी महाविद्यालयात चर्चेसाठी निमंत्रित केले होते. अशा नोटीसा प्राप्त नागरिक, व्यापारी यांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. संभाव्य बाधिताची नोटीस पाहून किंवा बाधिताच्या मालमत्तेचा उतारा, वीज बिल या पैकी एक पुरावा पाहून मतदान करू दिले जात होते.

सकाळी दहा ते दुपारी तीन वाजे पर्यंत मतदानाची प्रक्रीया पार पडली. यानंतर चार वाजता मतमोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण बाधित 585 पैकी 485 जणांनी मतदानात सहभाग घेतला. या 485 मतदारांपैकी 458 जणांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान केले. तर 15 जणांनी कॉरिडॉरला पाठींबा, 9 जण तठस्थ व 3 मते बाद ठरविण्यात आली. अनेक संभाव्य बाधित परगावी असल्याने मतदान करू शकले नाहीत.
मतमोजणीची सर्व प्रक्रीया करताना चित्रीकरण करण्यात आले होते. याबाबत सर्व माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठविण्यात येणार असल्याचे बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी सांगितले.

