पुणे शहरासाठी पावसाळ्याच्या अनुषंगाने आंतरविभागीय समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवा,शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांचेसह विविध विभागांना दिले निर्देश
पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२५ – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेमध्ये शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम,अतिरिक्त आयुक्त बी.पी. पृथ्वीराज, एम.जे.प्रदीप चंद्रन,ओमप्रकाश दिवटे,नगर अभियंता प्रशांत वाघमारे,आरोग्य प्रमुख नीना बोर्डे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, दरवर्षी पेक्षा यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले असून प्रशासनाची पावसाळ्यापूर्वीची कामे शहरातील अनेक भागात अद्यापही चालूच आहेत.यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, जेणेकरून यापुढील काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याबाबतची दक्षता घ्यावी असे निर्देश देखील त्यांनी दिले.
त्या पुढे म्हणाल्या की,शहरात अनेक ठिकाणी जुने वाडे, इमारती या धोकादायक स्थितीमध्ये असतील तर अशा वास्तूंना खाली करून डागडुजी करण्याबाबत संबधित जागा मालकांना अवगत करण्यात यावे.आपल्या शहरात पुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.त्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि त्याचा अहवाल सादर करण्यात यावा,अशा प्रकारचे निर्देश देखील त्यांनी दिले.

त्या पुढे म्हणाल्या की,पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे.ही चार ही धरणे ९० टक्के भरल्यानंतर नियमानुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करतेवेळी नदी पात्रालगत राहत असलेल्या नागरिकांना याबाबतचा संदेश देण्यात यावा,जेणेकरून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लवकर जाणे शक्य होईल. त्याचबरोबर मागील वर्षी सिंहगड रोड परिसरातील नदी पात्रालगत असणार्या काही सोसायट्यांना पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.त्यानंतर तेथील रहिवाशां करिता पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकार मार्फत आवश्यक ती मदत केली.पण यंदा त्या भागात मागील वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.
त्या पुढे म्हणाल्या की,सामान्यतः जिल्ह्याकरिता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रमुख जिल्हाधिकारी असतात.आपत्ती व्यवस्थापन अधिनियमात केंद्र सरकारने सुधारणा केली करून शहरी भागासाठी महानगरपालिका आयुक्त हे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असणार आहेत.मात्र याबाबत महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढणे आवश्यक आहे.त्यामुळे या निर्णयाची राज्यातील सर्व महापालिकामध्ये करण्यात यावी जेणेकरून कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास तात्काळ महापालिका आयुक्तांना निर्णय घेणे सोयीचे ठरेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

