मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा -मुख्याधिकारी महेश रोकडे
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०६/२०२५ – पंढरपूर शहरात आषाढी यात्रा भरत आहे. यात्रेसाठी राज्यातील विविध भागातून लाखो भाविक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शना साठी येत असतात. शहरात व उपनगरात सर्वत्र गाय, बैल, म्हैस व गाढव ही मोकाट जनावरे फिरत असतात. ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी उधळल्यास मोठा अपघात होवुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सुचनेनुसार नगरपरिषदेने मोकाट जनावरांचे मालकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 289 नुसार नोटीस देण्यात आली आहे. तसेच शहरात व उपनगरात मोकाट फिरताना आढळुन आलेली 55 जनावरे नगरपरिषदेकडील मक्तेदार यांच्या मार्फत दि.16 जून पासुन पकडुन नगर परिषदेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे सर्व जनावरांचे मालकांनी यात्रा कालावधी मध्ये जनावरांना मोकाट न सोडता नगरपरिषदेस सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 289 नुसार 10 दिवसांचे आत अशा जनावराचा मालक किंवा अभिकर्ता जनावरांची मागणी करेल.परंतू कोंडवाड्याची फी व आकारण्यात येणारा खर्च देण्यास नकार देईल.तसेच जे जनावरांचे मालक जनावरे सोडविण्यास येणार नाहीत, अशी जनावरे महाराष्ट्र नगर परिषद,नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 288 नुसार सदर जनावरांचा लिलाव करुन त्याची विक्री केली जाईल किंवा गोशाळेकडे दिली जातील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे सुचित केले आहे.

एकल वापर प्लास्टीक बंदी
राज्य शासनाने एकल वापर प्लास्टिक बंदी केली आहे.महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळा कडुन एकल वापर प्लास्टिक अर्थात सिंगल युज प्लास्टिक यांचा वापर करु नये असे आदेश देण्यात आलेले आहेत.त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेमार्फत पंढरपूर शहरातील महाद्वार परिसरात दि. 4 जूनपासुन प्लास्टिक बंदी मोहीम सुरु केली आहे.शहरातील नागरिक, आस्थापना यांना एकल प्लास्टिक तसेच प्लास्टीक,थर्माकॉल पासून बनविण्यात येणार्या वस्तु( ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, काटे, वाटी, चमचे, प्लास्टिक पिशव्या ) इत्यांदीचा वापर करु नये.यात्रा कालावधी मध्ये नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आवाहन केले आहे.