शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२५ : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 रोजी तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागतव इतर शेतीकामासाठी रस्त्याची नितांत आवश्यकता असते. राज्यात एकत्रीकरण योजनेंतर्गत विविध रस्त्यांचा समावेश गाव नकाशात करण्यात आला आहे. परंतु अजूनही बरेच रस्ते नकाशात नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कारणावरून शेतकऱ्यांच्यामध्ये वादविवाद व कोर्टकचेरी होताना दिसून येते. यावर उपाय म्हणून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून दिनांक 29 ऑगस्ट रोजी शासन निर्णय जारी झाला असून आता गावातील सर्व रस्त्याचे सर्व्हेक्षण करून त्याचे सीमांकन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. सीमांकन झालेल्या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यात बुधवार दिनांक 10 पासून सलग तीन दिवस तालुक्यातील प्रत्येक गावात सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
हे सर्व्हेक्षण ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, महसूल सेवक, पोलिस पाटील यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
गावनिहाय तयार करण्यात आलेली रस्त्यांची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसील कार्यालयात सादर केली जाईल.
तहसील कार्यालयातून सदर यादी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना पाठवण्यात येईल व त्यांच्या मार्फत सीमांकन करण्यात येईल. तसेच भूमी अभिलेख विभाग रस्त्याच्या अक्षांश व रेखांशसह रस्त्याच्या हद्दीवर सीमा चिन्हे स्थापित करतील.
सदर शिवार फेरीवेळी सर्व्हेक्षण करणाऱ्या पथकासोबत स्थानिक नागरिकांनी सुद्धा सहभाग नोंदवावा व सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.