भाळवणी येथे शॉर्टसर्किटमुळे १५ एकर ऊस जळून खाक : संभाजी शिंदेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
भवानी मंदिर परिसरातील ऊस आगीची घटना गंभीर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी प्रयत्न करणार – संभाजी शिंदे
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शॉर्टसर्किटमुळे १५ एकर ऊस जळून सात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनाम्याचे आश्वासन दिले.
भाळवणी | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भवानी मंदिराच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागून तब्बल १५ एकर ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत सात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेतली.

या आगीत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये रामचंद्र वसंत सावंत (गट नं. ९५३/२ – २ एकर ऊस व १ एकर आंबा), मोहन तुकाराम माने (गट नं. ९५३/१ – ४ एकर ऊस), दीपक विलास तारळकर (गट नं. ९८५ – दीड एकर ऊस),दिलीप कुमार महादेव वाघमारे (गट नं. ९८९/६ – अडीच एकर ऊस), मनोज रामचंद्र डंबाळ (गट नं. ९८६ – दीड एकर ऊस), अनिल ज्ञानदेव वाघमारे (गट नं. ९८९/४ – दीड एकर ऊस) यांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले की, जुना शिंदे डीपीवर शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे.या परिसरात वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना घडत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

या आगीत केवळ ऊस पिकाचेच नव्हे तर ठिबक सिंचन व्यवस्था,पाईप, सबमर्सिबल,केबल,चेंबर व इतर शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तलाठी व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन संभाजी शिंदे यांनी दिले.
यावेळी महावितरणचे अधिकारी मिले यांच्यासह शेतकरी रामचंद्र सावंत,दिलीप वाघमारे,मनोज डंबाळ,बाळू गवळी, मोहन माने,दीपक तारळकर,अर्जुन गवळी, अनिल वाघमारे, मुसा शेख,वैभव वाघमारे, बबलू पाटील, बंडू शेख,मोहन वाघमारे आदी उपस्थित होते.





