सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे क्रीडा सप्ताहाचा दिमाखदार प्रारंभ : पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांच्या हस्ते उद्घाटन

सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे क्रीडा सप्ताहाचा दिमाखदार प्रारंभ : पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांच्या हस्ते उद्घाटन

300 मीटर ट्रॅकसह अद्ययावत क्रीडांगणावर सनराईज पब्लिक स्कूलचा क्रीडा सप्ताह उत्साहात सुरू

सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रेखा घनवट व सौ.सुनिता गायकवाड यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांचे संचलन, सैनिकी प्रशिक्षण व अद्ययावत क्रीडांगण ठरले आकर्षण.

शेळवे /ज्ञानप्रवाह न्यूज/ संभाजी वाघुले: सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.उद्घाटन सोहळ्या साठी प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट व सौ.सुनिता संग्राम गायकवाड तसेच भंडीशेगावच्या विद्यमान पोलीस पाटील व माजी सरपंच सौ.शितल कस्तुरे उपस्थित होत्या.

प्रारंभी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व देखणे संचलन सादर करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. त्यानंतर लाठी-काठी, दांडपट्टा यांसारखी धाडसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा सप्ताह, क्रीडा साहित्य व भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले.

सनराईज पब्लिक स्कूलच्या नियोजित नवीन इमारतीसमोर अत्यंत प्रशस्त व आधुनिक असे क्रीडा मैदान विकसित करण्यात आले असून येथे 300 मीटर रनिंग ट्रॅक,हॉलीबॉल, क्रिकेट,कबड्डी, खो-खो,लांब उडी,उंच उडी,गोळाफेक, थाळीफेक,भालाफेक,नेमबाजीसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.याच मैदानावर विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेतला जातो.

यावेळी मार्गदर्शन करताना पंढरपूर ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाचे व शाळेत सुरू असलेल्या सैनिकी प्रशिक्षणाचे विशेष कौतुक केले.अभ्यासा सोबतच आहार व खेळ यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वही त्यांनी अधोरेखित केले.

सौ.सुनिता गायकवाड यांनी आपल्या भाषणात सनराईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याचे नमूद केले. क्रीडा, वक्तृत्व व कला क्षेत्रातही सनराईजचे विद्यार्थी अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले.आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अंकुश गाजरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन गायकवाड व योगेश गायकवाड यांनी केले.

क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागासह सर्व शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

क्रीडा सप्ताहासाठी विद्यार्थ्यांची सनराईज टायगर, सनराईज पँथर्स, सनराईज लॉयन व सनराईज जाग्वार अशी विभागणी करण्यात आली आहे. या सप्ताहात खो-खो, कबड्डी, क्रिकेट, रस्सीखेच, नेमबाजी, रनिंग, हॉलीबॉल, लंगडी, प्रश्नमंजुषा व वादविवाद अशा विविध स्पर्धा होणार असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली.

Leave a Reply

Back To Top