श्री माताजी निर्मलादेवी विद्यामंदिरात विद्यार्थी स्वयंपाक महोत्सव : आनंदी शनिवार उपक्रमात जीवन कौशल्यांचा अनुभव
श्री माताजी निर्मलादेवी विद्यामंदिरात आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वयंपाक महोत्सवाचे आयोजन: चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वयंपाक करून जीवन कौशल्य,कष्टांची जाणीव व लिंग समानतेचा संदेश अनुभवला.

Pandharpur news: पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज – श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थापक सचिवा सुनेत्राताई पवार यांच्या संकल्पनेतून आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत जीवन कौशल्य शाळा म्हणून विद्यार्थी स्वयंपाक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वयंपाक तयार करण्याचा अनुभव घेतला.पाच गटांमध्ये विभागलेल्या विद्यार्थ्यांनी घरून पीठ, मीठ,मसाले,तांदूळ व भाजीपाला आणला होता. मैदानातील लाकडी फाटे गोळा करून विद्यार्थ्यांनी पारंपरिक चुली पेटवल्या व स्वयंपाकास सुरुवात केली.दररोज तयार डबा आणताना आईला किती कष्ट करावे लागतात याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली.

कुणाची कणीक जास्त घट्ट झाली, तर कुणाच्या भाकऱ्या तव्यावर येईपर्यंत दोन-तीन वेळा फुटल्या. मध्येच चूल विझल्याने धूर झाला, चूल फुंकताना त्रासही सहन करावा लागला; मात्र शेवटी तयार झालेला स्वयंपाक सर्वांच्याच पसंतीस उतरला.

विद्यार्थ्यांनी बाजार आमटी,बटाट्याची भाजी,वांग्याची भाजी,पातळ पिठलं, मसालेभात व भाकऱ्या तयार केल्या. भाकऱ्या आकाराने जरी वेगवेगळ्या असल्या तरी चवीला मात्र अत्यंत उत्तम झाल्या. सर्व पदार्थ पंक्तीपद्धतीने बसून शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंदाने ग्रहण केले.

मुख्याध्यापक संतोष कवडे व वर्गशिक्षक महेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले तर अश्विनी गुमटे, सुवर्णा जगदाळे,राणी लाडे व जिजाबाई सोनटक्के यांनी मुलांना स्वयंपाक करताना मोलाची मदत केली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंपाकासारख्या महत्त्वाच्या जीवन कौशल्याची ओळख करून देणे,त्यातील कष्ट समजावणे,आई-वडिलांना घरकामात मदत करण्याची जाणीव निर्माण करणे तसेच लिंग समानतेचा संदेश देणे हा होता. स्वयंपाकानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेत जीवनातील महत्त्वाचा अनुभव घेऊन आनंदाने घरी परतले.

