लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा -ॲड.चैतन्य भंडारी
धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज – परवा आमच्या सफाईवाल्या मावशी सांगत होत्या की,त्यांना एक कॉल आलेला,अन त्यात ते लाडकी बहीण योजनेत भरलेल्या फॉर्मबद्दल सांगून त्यात माहिती अपूर्ण आहे असं म्हणत होते.
मी कामात होते म्हणून त्यांना म्हटलं नंतर बोलते आणि तुम्हाला त्याबद्दल नीट विचारावं म्हणून कानावर घातलं.
याबाबत बोलताना ॲड.चैतन्य भंडारी म्हणाले की, मग माझ्या लक्षात आलं की सायबर भामटे आता इकडे वळले आहेत तर. आमच्या मावशींना मी सावध केलेच पण म्हटलं यानिमित्ताने तुम्हालाही सावध करावे. तर महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात महिलाना आवडलेली लाडकी बहीण योजना सर्वत्र गाजते आहे. लाखो अर्ज सरकार दफ्तरी दाखल झाले असून त्याची छाननी सुरु आहे. आता महिलांना प्रतीक्षा आहे ती त्यांच्या खात्यात पैसे येण्याची आणि नेमका याचाच फायदा घेत सायबर भामट्यांनी नवीन फसवणुकीचे प्रकार सुरु केले आहेत. आणि या योजनेत अर्ज दाखल करणाऱ्या महिला या जास्त टेक्नोसॅव्ही नसतात हे माहित असल्यानेच भामट्यांनी हे सापळे रचून फसवणे सुरु केले आहे. तेव्हा सावध राहा मंडळी.
यात फसवणूक नेमकी कशी होते तर तुम्हाला कॉल येऊ शकतो आणि सांगितलं जात की,तुमच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन सुरु असून एक दोन त्रुटी त्यात आढळून आल्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
मग तुम्ही विचारता की,नेमक्या काय त्रुटी आहेत ? त्यावर सांगितलं जातं की, त्यासाठी आम्ही एक लिंक पाठवतो.त्यावर क्लिक करून पुढे आवश्यकतेप्रमाणे त्या त्या जागी राहिलेली माहिती भरा आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी नंबर येईल तो आम्हाला द्या, म्हणजे तुमच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन झाले याची नोंद आमच्याकडे होईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे पाठवले जातील.
तुम्हीही त्या झाशात येऊन त्या लिंकला क्लिक करता आणि त्याक्षणी तुमच्या फोनचा ऍक्सेस त्या भामट्याकडे जाऊन जणू तुमच्या फोनचा क्लोन तयार होतो जो त्यांच्या हातात असतो आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो.जो तुम्ही भामट्याला देता आणि दुसऱ्याच मिनिटाला तुमचे बँक खाते रिकामे केले जाते. पैसे येणे तर दूरच पण खात्यात होते तेही पैसे घालवून बसता.
मग आता यावर उपाय काय ?
ॲड.चैतन्य भंडारी सांगतात उपाय फार सोपा आहे तो लक्षात ठेवा. सरकारतर्फे कुणालाही अशा प्रकारचा कॉल जात नाही, मेसेजही जात नाही. त्यांना जे काही जाहीर करायचे असते ते त्या त्या संबंधित विभागाच्या माध्यमातून आणि सरकारी वेबसाईट वरून जाहीर केले जाते. त्यामुळे असा कुणाचाही कॉल आला / मेसेज आला तर त्याला रीस्पॉन्ड करू नका. कोणत्याही अनोळखी लिंकला क्लिक करू नका आणि चुकून केलेच गेले असेल तर किमान नंतर तुम्हाला आलेला ओटीपी तरी कुणाला देऊ नका. म्हणजे फसवणूक होणार नाही आणि जमलंच तर नंतर मोबाईल व्हायरस क्लीन करून घ्या. म्हणजे त्या लिंकमधून आलेला छुपा व्हायरस नष्ट होईल आणि तुमचा फोन सुरक्षित होईल असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी व डॉ.धनंजय देशपांडे पुणे यांनी केले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.