रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 – रिपब्लिकन पक्षाला पुढे जायचे असेल तर स्वतःच्या बळावर काही लोक निवडून आणावे लागतील.आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत पण मागायचे किती दिवस ? स्वबळावर आमदार निवडून आणल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष बळकट होऊ शकत नाही. त्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी शिस्त पाळा; सर्व जाती धर्मियांना सोबत घ्या; लोकांचा विश्वास जिंकून विधानसभेत आपले लोक निवडून आणा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाल्याबद्दल ना.रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहर तर्फे सर्वधर्मीय गुरूंच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी महाथेरो भन्ते नागघोष (धम्मदायाद बुध्द बिहार), फादर भाऊसाहेब संसारे (रेक्टर, पिपल्स सेमिनरी), ग्याणी अमरजित सिंग (अध्यक्ष, गुरुनानक दरवार रेसकोर्स), संजय भोसले (उपाध्यक्ष, इस्कॉन इंटरनॅशनल), मौलाना सय्यद मुसा (दारूल उलूम, पुणे),रावसाहेब झेंडे जेष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ता यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला मिळालेल्या ऊस धारक शेतकरी (गन्ना किसान) या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर, माजी अध्यक्ष अशोक कांबळे, युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, चंद्रकांता सोनकांबळे, संघमित्रा गायकवाड आदींसह आरपीआय कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, रिपब्लिकन ऐक्याची चर्चा नेहमीच होते. परंतु नेत्यांमध्ये काही केल्या ऐक्य होताना दिसून येत नाही. परंतु नेत्यांचे ऐक्य होत नसेल तर कमीत कमी जनतेचे ऐक्य करणे गरजेचे आहे. त्यातून आपलाच समाज आणखी मजबूत होईल व सत्तेत आपल्याला अधिक वाटा मिळेल. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा आहे. आम्ही महायुतीत सातत्याने मागणी करीत असतो परंतु केवळ मागण्या किती दिवस करायच्या, हेही आपल्याला ठरवावे लागेल.

Leave a Reply

Back To Top