टी-20 विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाला धक्का? भारतीय संघाच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह
सूर्यकुमार यादव बाहेर, श्रेयस अय्यर-तिलक वर्मा शर्यतीत; टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराबाबत चर्चांना उधाण
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी –भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 नेतृत्वाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापन नव्या नेतृत्वाचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या काही महिन्यांत सूर्यकुमार यादवचा फलंदाज म्हणून अपेक्षित प्रभाव दिसून आलेला नाही. तसेच फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संघाच्या दीर्घकालीन योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे श्रेयस अय्यर आणि युवा फलंदाज तिलक वर्मा यांची नावे कर्णधारपदासाठी चर्चेत आली आहेत. श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाचा मोठा अनुभव असून दबावाखाली संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता त्यांनी अनेकदा सिद्ध केली आहे. तिलक वर्मा हा युवा पर्याय म्हणून संघ व्यवस्थापनाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिती आगामी मालिकांतील कामगिरी,फिटनेस आणि संघातील समतोल लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना केवळ तर्क-वितर्क म्हणूनच पाहिले जात आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये मात्र भारतीय टी-20 संघाचा पुढील कर्णधार कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

