संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केली पाहणी

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांवर भर

वारीपूर्व तयारीला वेग; पालखी तळांवर स्वच्छता, आरोग्य व अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचे निर्देश

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ /०६/२०२६: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली तसेच माळशिरस तालुक्यातील बोरगाव आणि अकलूज येथील पालखी तळ व पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे,सहाय्यक प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पागांरकर,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री.औटी,कार्यकारी अभियंता अमित निमकर,जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान विभागीय आयुक्तांनी पालखी तळांची स्वच्छता, सपाटीकरण, चिखल होऊ नये यासाठी मुरूम टाकणे तसेच पावसाचे पाणी साचू नये म्हणून योग्य निचरा व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. वारी काळात लाखो वारकऱ्यांना मूलभूत सुविधा आणि आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय संपूर्ण पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उभारण्यात यावीत, स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात ठेवावे तसेच पालखी तळांवर अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असून वारकऱ्यांना सुरक्षित,स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Back To Top