जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज : आमदार समाधान आवताडे

जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज : आ.समाधान आवताडे

आ.आवताडे यांनी घेतली पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची बैठक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज असून पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग,ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्व्हे सुरू आहे.पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणे मोहीम हाती घेतली जाईल तसेच दूषित पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पंढरपूर शहरात नुकतेच जीबीएस चे दोन रुग्ण आढळले होते.या पार्श्वभूमीवर सोमवारी आ.समाधान आवताडे यांनी प्रशासनाची बैठक पंढरपूर शासकीय विश्राम गृह येथे घेतली. या बैठकीस प्रांताधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार सचिन लंगुटे,मदन जाधव,पंढरपूर सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, नगर पालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्य विभागाचे वाघमारे,तोडकरी यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी,पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

प्रारंभी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश सुडके यांनी जीबीएस साथीबाबत माहिती दिली.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले,पंढरपूर नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी शहरातील नियोजनाची माहिती दिली.

पुढे बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले की,पंढरपूर शहरात जीबीएसचे दोन रुग्ण सापडले आहेत.नुकतीच माघी यात्रा संपन्न झाली आहे तसेच शनिवार,रविवारी शहरात लाखावर भाविक येत असतात.पुणे,मुंबई येथील जीबीएस साथीचे रुग्ण वाढलेले आहेत.या पार्श्वभूमीवर gbs चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका प्रशासनाने दक्षता घ्यावी.हा रोग मुख्यतः पाणी आणि अन्नातून प्रसारित होतो, हे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याच्या योजना भीमा नदीवर अवलंबून आहेत,या पाण्याच्या योग्य त्या तपासण्या करण्यात याव्यात, पाणी शुद्धीकरण करण्याचे काम केले जावे, अशा सूचना केल्या.

Leave a Reply

Back To Top