राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन
सादिक खाटीक यांच्या प्रयत्नांना यश

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ११ वेळा आमदार पद,२ वेळा मंत्रीपद भुषविणारे नेते दिवंगत कै.गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सांगोला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पत्र लिहून समर्थन दिले.
आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार, शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी आज सांगोला येथे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन राजेवाडी तलाव प्रश्नी लक्षवेधी समर्थन देणारे पत्र स्विकारले .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या या खास पत्रात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी,१८७६ साली उभारलेला ३ टीएमसी क्षमतेचा हा म्हसवड तलाव म्हसवड ता.माण जि.सातारा हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या ज्या राजेवाडी गावात उभा आहे तो राजेवाडी तलाव नावापासून आणि ६ – ७ गावांचा अपवाद वगळता बहुतांश आटपाडी तालुका १४० वर्षापासून पाण्याअभावी वंचित आहे हे मोठे दुर्देव आहे, याकडे लक्ष वेधले .
म्हसवड मध्यम प्रकल्पाचे नाव शासन दरबारी राजेवाडी तलाव असे केले जावे .फलटण जि.सातारा येथील या तलावाचे मुख्य व्यवस्थापन, सांगली जिल्हा जलसंपदाकडे दिले जावे.पंढरपूर जि.सोलापूर येथील उपविभागीय कार्यालय आटपाडी जि. सांगली येथे सुरु केले जावे.महुद ता.सांगोला जि.सोलापूर येथील शाखा कार्यालया बरोबरच राजेवाडी ता.आटपाडी येथेही नवीन शाखा कार्यालय केल्यास माण तालुक्याच्या दृष्टीने सोयीचे होईल असेही या पत्रात म्हटले आहे .
राजेवाडी तलावाला नवा कॅनॉल काढून आटपाडी ( सांगली ) तालुक्याच्या पश्चिम भागातले सर्व तलाव,तलाव जोड प्रकल्पाद्वारे जोडत हे पाणी आटपाडी तालुक्यात सर्वत्र फिरविले जावे आणि शेवटी सांगोला तालुक्यात अन्यत्र व बुध्दीहाळ तलावात ( सांगोला ) सोडले जावे, उरमोडीचे पाणी जिहे कटापुर च्या माध्यमातून किंवा कारखेल पासून जाणाऱ्या निरेच्या पाण्याने राजेवाडी तलाव बारमाही प्रवाहीत केला जावा . या तलावात निम्म्याने साचलेल्या गाळाने हजारो एकर पडीक जमीन सुपीक बनविली जावी . या तलावाची पाणी साठवण क्षमता पूर्ववत ३ टीएमसी पर्यत न्यावी.आटपाडी तालुक्या तील उन्हाची घनता लक्षात घेवून राजेवाडी तलावाचे पाणलोट क्षेत्र,आटपाडी तालुक्यातील विविध तलाव, त्यांचे कॅनाल, या परिसरामधून प्रचंड सौर उर्जा निर्मिती व्हावी, आटपाडी तालुक्यातील प्रचंड डोंगर रांगावर पवन चक्यांच्या माध्यमातून वीजनिर्मिती करून राजेवाडीचे सर्व नवसुधारणांचे सोपस्कर पार पाडले जावे . या लक्षवेधी न्याय मागण्यांच्या अनुषंगाने राज्य शासनाने योग्य तो निर्णय सत्वर करावा अशी आग्रही विनंतीही आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी या पत्रात केली आहे .
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या या पत्राने राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यासह लाभक्षेत्रातील अन्य भागाच्या हिताच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी हत्तीचे बळ येणार आहे . या पत्राच्या माध्यमातून राज्याचे दिवंगत नेते गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे अप्रत्यक्षरित्या आशिर्वाद व पाठबळ मिळणार असल्याची भावना सादिक खाटीक यांनी बोलून दाखविली.

