स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मात्र बोगस वैद्यकीय व्यवसाय ठरवून गुन्हे गंभीर दाखल केले जात आहेत
पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- राज्यातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी वैद्यकीय व्यवसायास परवानगी दिलेली असतानाही स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मात्र बोगस वैद्यकीय व्यवसाय ठरवून गुन्हे गंभीर दाखल केले जात आहेत. या अन्यायास वाचा फोडण्यासाठी 22 जुलै 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे ,अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे यांनी दिली आहे.
इलेक्ट्रोहोमिओपॅथी ही एक नैसर्गिक हर्बल चिकित्सा पद्धती असून अतिशय स्वस्त, शीघ्र प्रभावी व दुष्परिणाम रहीत उपचार पद्धती आहे. या चिकित्सा पद्धतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरात सुमारे तीस हजार चिकित्सक आपला वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.संबंधित व्यावसायिकांना उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी व्यवसायास अंतिम परवानगी दिलेली असतानाही शासनाच्या योग्य कायदेशीर नियमनाअभावी स्थानिक जिल्हा प्रशासना कडून संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 30 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय समितीची नियुक्ती केलेली होती. या समितीचा अहवाल तब्बल आठ महिन्यानंतर शासनास 4 जुलै 2024 ला सादर झालेला आहे.यानंतर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात या अहवालातील शिफारसी स्वीकारून तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.तसेच राज्यभरातून हजारो चिकित्सकांनी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत हजारो पत्रे पाठवून संबंधित विषयावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केलेली आहे.
न्यायालयीन आदेश असतानाही शासना कडून याचे योग्य नियमन होत नसून असे गुन्हे दाखल करून समाजामध्ये बदनामी होण्यापेक्षा आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करून मरण पत्करू या भावनेने अंतिम न्याय मिळण्याविण्याचा संकल्प करून हजारो चिकित्सक 22 जुलै 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत ,अशी माहिती इलेक्ट्रोहोमिओपॅथी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ.प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे.