PM Kisan व नमो शेतकरी योजनांतील वंचितांना न्याय? विधानभवनात आवताडेंची मागणी

PM Kisan व नमो शेतकरी योजनांतील वंचितांना न्याय? विधानभवनात आवताडेंची मागणी

आमदार समाधान आवताडे यांचा विधानभवनात जोरदार आवाज : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीतील पात्र शेतकऱ्यांना न्यायाची मागणी

Mumbai vidhanbhavan : मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज— पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला.

केंद्राच्या पीएम किसान PM Kisan योजनेची यादीच राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी वापरली जात असल्याने, केंद्राच्या यादीतील त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी राज्य योजनेपासूनही वंचित राहत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.१ फेब्रुवारी २०१९ ही नोंदणीची अंतिम तारीख निश्चित असल्याने २०१९ नंतर सातबारावर नाव नोंद झालेल्या नव्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याची बाबही सभागृहात मांडण्यात आली.

मंगळवेढा तालुक्यातून डिसेंबर २०२४ मध्ये पाठवलेल्या १९८९ प्रस्तावांपैकी ४०२ प्रस्ताव प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. डिसेंबर २०२५ पासून संबंधित पोर्टल बंद असल्याची माहिती स्थानिक ई-सेवा केंद्रांकडून मिळत असून अर्जांच्या छाननी व मंजुरीचे अधिकार राज्यस्तरावर केंद्रीत असल्याने स्थानिक पातळीवर निपटारा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या सर्व मुद्द्यांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.१ फेब्रुवारी २०१९ नंतर नोंद झालेल्या नव्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय करण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली.

Leave a Reply

Back To Top