राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या नातीने केला होता हा भाबडा हट्ट

राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या नातीने केला होता हा भाबडा हट्ट

राजभवन सुंदर आहे… तुम्ही मुंबई येथे बदली घेऊन येथील नोकरी मिळवायचा प्रयत्न का करत नाही ? – उमेश काशीकर यांचे मनोगत

जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यनिर्मितीपासून महाराष्ट्राला लाभलेल्या २१ राज्यपालां मध्ये अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या.त्यापैकी एक म्हणजे फेब्रुवारी १९९० ते जानेवारी १९९३ या कालावधीत राज्यपाल असलेले भारतरत्न सी सुब्रमण्यम.देशातील हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता.

आपले जीवनचरित्र हॅन्ड ऑफ डेस्टिनी मध्ये सुब्रमण्यम यांनी मलबार हिल येथील राजभवनाचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे.

राजभवनाच्या सौंदर्याचे वर्णन करताना त्यांनी राष्ट्रपती आर वेंकटरमण यांच्या नातीने आजोबांकडे केलेल्या एका आगळ्या वेगळ्या हट्टाचा उल्लेख केला आहे.

सी.सुब्रमण्यम लिहितात : देशातील सर्वोत्कृष्ट राजभवन म्हणून मुंबई राजभवनाचा सार्थ लौकिक आहे.सौंदर्याचे गुणग्राहक असलेल्या पंडितजींचे हे एक आवडते निवासस्थान होते.मलबार हिल या मुंबईतील सर्वोत्तम परिसरात, निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे राजभवन अत्यंत देखणे व दिमाखदार आहे.त्याला गतकाळा तील वैभवाचे कोंदण तर लाभले आहे परंतु त्यामध्ये कोठेही वसाहतकालीन वास्तूचा भडकपणा नाही.

छोटी मोठी उतरंड, हिरवाईने नटलेल्या पाऊलवाटा,नयनरम्य लॉन्स तसेच सौंदर्याचा विचार करून मांडलेली फुलझाडे व रोपे यांमुळे हे ठिकाण नितांत सुंदर आणि स्वर्गीय वाटते. येथील भोजन कक्षातून दिसणारा निळसर झगमगणारा अरबी समुद्र आपल्या हलक्या फेसाळ लाटांनी किनाऱ्याला अलगद स्पर्श करताना पाहण्याचा अनुभव काही वेगळाच असतो.अनेकदा मी त्या दृश्याचा आनंद घेतला.अशा वातावरणात साध्या जेवणालाही एक स्वप्नवत गोडी लाभायची !

मला राजभवनातील एका कर्मचाऱ्याने सांगितलेला व कालांतराने राष्ट्रपती वेंकटरमण यांनीही स्वतः सांगितलेला तो मजेदार किस्सा आठवतो.मी महाराष्ट्राचे राज्यपालपद स्वीकारण्यापूर्वी वेंकटरमण आपल्या नातीसोबत मुंबई राजभवनात मुक्कामाला आले होते.

त्या मुलीला हे ठिकाण इतके आवडले की तिने आजोबांना म्हटले : आजोबा हे राजभवन किती सुंदर आहे! दिल्लीतील निवासस्थान राष्ट्रपती भवन अगदीच हे आहे. तुम्ही मुंबई येथे बदली घेऊन येथील (राज्यपाल पदाची) नोकरी मिळवायचा प्रयत्न का करत नाही ?

Leave a Reply

Back To Top