कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात भारतीय संविधानातील अल्पसंख्यांक अधिकारांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान
धर्मनिरपेक्षतेमुळेच भारताची लोकशाही समरस व सशक्त : प्रा.डॉ.सुशीलकुमार शिंदे
पंढरपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात भारतीय संविधानातील अल्पसंख्यांक अधिकारांवर व्याख्यान:धर्मनिरपेक्षतेमुळेच भारतीय लोकशाही सशक्त असल्याचे प्रा.डॉ.सुशीलकुमार शिंदे यांचे मत
Pandharpur news : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे अल्पसंख्यांक विकास समितीच्यावतीने भारतीय संविधानातील अल्पसंख्यांक अधिकार तरतुदी या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.सुशीलकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर पदवी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ.बाळासाहेब बळवंत हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पसंख्यांक विकास समितीचे नोडल ऑफिसर प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले.

मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले की,भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे भारतीय लोकशाही अधिक समरस, सहिष्णू व सर्वसमावेशक बनली आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत देशाच्या लोकशाही मूल्यांचे सार दडलेले असून धार्मिक राष्ट्राचा स्वीकार न करता धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वीकारल्यामुळेच देशात सामाजिक एकात्मता, बंधुता व शांतता टिकून आहे .धर्माधिष्ठित लोकशाही स्वीकारलेल्या काही देशांमध्ये लष्करी राजवट निर्माण झाल्याचे उदाहरण देत भारतीय संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आणि लोकशाही मूल्यांवरील जनतेच्या विश्वासामुळे भारतात आजपर्यंत लष्करी सत्ता प्रस्थापित झाली नाही,असेही त्यांनी नमूद केले.भारतामध्ये विविध धर्म,जाती, भाषा व संस्कृती यांचा संगम असून धार्मिक व भाषिक सलोखा हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकांच्या धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांचे संरक्षण केले असून कलम 14,15 व 16 अंतर्गत सर्व नागरिकांना समान संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्व धर्मांतील महिलांना अधिक न्याय व समानता मिळू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.बाळासाहेब बळवंत म्हणाले की, दंगलीमुळे देशाच्या आर्थिक व सामाजिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.जगातील विविध देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली असल्याने ते जगातील सर्वोत्तम व आदर्श संविधान ठरले आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता उपपल्ली यांनी केले. कार्यक्रमास प्रा.डॉ. दादासाहेब हाके,प्रा.सुलताना मुलाली,प्रा. सारिका मुळूक,प्रा.डॉ.सुमय्या पठाण, प्रा. डॉ.शैलेंद्र सोनवले, प्रा.गणेश भाकरे आदी उपस्थित होते.बी.ए.,बी.कॉम.व बी.एस्सी. शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यक्रमास उपस्थिती नोंदविली.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पसंख्यांक विकास समितीचे चेअरमन प्रा.रियाज शेख यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल माने व ओंकार नेहतराव यांनी प्रयत्न केले.






