माघ वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज:१,३८६ पोलीस व होमगार्ड तैनात – सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे

माघ वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; १,३८६ पोलीस व होमगार्ड तैनात – सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे

माऊली स्कॉड, ड्रोन व १६२ सीसीटीव्ही द्वारे पंढरपूरवर कडक सुरक्षा; वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन

माघ शुद्ध एकादशी निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून १,३८६ पोलीस अधिकारी-कर्मचारी व होमगार्ड, माऊली स्कॉड, ड्रोन आणि १६२ सीसीटीव्हीद्वारे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.

Pandharpur maghi news:पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ :माघ शुद्ध एकादशी दि. २९ जानेवारी २०२६ रोजी असून, माघ वारीच्या कालावधीत पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भाविक दाखल होतात. या पार्श्वभूमीवर वारी निर्विघ्नपणे पार पडावी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.

माघ वारीदरम्यान वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एकूण १ हजार ३८६ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये २ पोलीस उपअधिक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ७९ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ६८८ पोलीस कर्मचारी आणि ६०० होमगार्ड यांचा समावेश आहे. याशिवाय आरसीपी, क्युआरटी, बीडीएस तसेच कार्ट पथके देखील नियुक्त करण्यात आली आहेत.

वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, भक्ती सागर (६५ एकर), महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेड आदी ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांचे संरक्षण तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी माऊली स्कॉड स्थापन करण्यात आला असून, यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.याशिवाय ड्रोन कॅमेरे आणि १६२ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

वारी काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी १० गामा पेट्रोलिंग पथके आणि ९ ठिकाणी वाहतूक डायव्हर्शन पॉईंट्स सुरू करण्यात आले आहेत.खाजगी वाहनधारकां साठी शहरात व शहराबाहेर १३ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.

वारी सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी वारकरी भाविकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top