पोलीस तुमच्या मदतीला आहेत : पंढरपूरात निर्भया पथक व विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य

पंढरपूरात निर्भया पथकाचे जनजागृती पथनाट्य; मुलांच्या सुरक्षिततेचा संदेश नागरिकांपर्यंत

पोलीस तुमच्या मदतीला आहेत : पंढरपूरात निर्भया पथक व विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य

Pandhapur news:पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ : मुलांची सुरक्षितता,संरक्षण आणि त्यांच्या मध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने पंढरपूर शहरात निर्भया पथकाच्यावतीने जनजागृती पर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमातून मुलांना पोलीस यंत्रणेशी जवळीक निर्माण होऊन अडचणीप्रसंगी मदतीचा विश्वास मिळावा, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक आणि स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने हे पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्याद्वारे बालसुरक्षा, महिलांची सुरक्षितता, सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांची सजगता याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

यावेळी निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव यांनी सांगितले की, आजच्या काळात मुलांची काळजी, संरक्षण आणि सुरक्षितता ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.मुलांना पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास वाटणे आणि संकटाच्या वेळी मदत मिळेल ही भावना निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

समाजातील प्रत्येक नागरिक सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी राहावा, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित आणि संवेदनशील समाज घडविण्याची ही केवळ जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून बालसुरक्षा आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

शहरातील अनेक चौकांमध्ये रोडरोमिओ शाळेतून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची टिंगल करत असतात तसेच दोन चाकी वाहने वेगाने चालवून भिंती निर्माण करतात.काही वेळा महिलांच्या वाहनांना कट मारुन जातात त्यामुळे वर्दळीच्या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत निर्भया पथकाने लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

Leave a Reply

Back To Top