खर्डीतील सिताराम साखर कारखान्यासमोरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे; सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य

खर्डीतील सिताराम साखर कारखान्यासमोरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे; सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य

4 दिवसांच्या संघर्षाला यश,खर्डीतील तरुण शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे, कारखाना प्रशासनाची लेखी हमी

कारखान्याच्या हंगाम काळात तसेच इतर वेळेसही सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांवर लवकरच प्रभावी उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे.

पंढरपूर | अमोल कुलकर्णी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जून २०२६ : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील खाजगी सिताराम साखर कारखान्याच्या गेटसमोर सुरू असलेले तरुण शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी यशस्वी ठरले. कारखाना प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले होते. कारखान्यातून होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण, सांडपाण्याचा प्रश्न,बग्यासची समस्या तसेच परिसरात पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त होते. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी तरुण शेतकऱ्यांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

आंदोलनादरम्यान गजानन घाडगे, अनिल अगावणे, राजू पुंडेकर, आप्पासाहेब घाडगे,विष्णू सुळे, काशिलिंग खताळ यांच्यासह आंदोलनकर्त्यांची कारखान्याच्या सर्वेसर्वा राजलक्ष्मी गायकवाड यांच्याशी चर्चा झाली. यानंतर कारखाना प्रशासनाने अधिकृत लेखी निवेदन देत विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक,तालुका पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर तसेच तपकिरी शेटफळ, खर्डी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कारखान्याच्या हंगाम काळात तसेच इतर वेळेसही सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांवर लवकरच प्रभावी उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे.

लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन पार पडल्याने आंदोलनकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी तहसीलदार सचिन लंगोटे तसेच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Back To Top